ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई लोंढे कोपरगावकर यांचे सरकारकडून पुनवर्सन !

संगमनेर Live
0
◻️ मुख्यमंत्री, पालकमंत्री, सांस्कृतिक मंत्र्यांकडून प्रशासनाला मदतीच्या सूचना

 ◻️ जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून शांताबाईची भेट घेऊन विचारपूस

संगमनेर LIVE (शिर्डी) | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई अर्जून लोंढे - कोपरगावकर यांची आज द्वारकामाई वृध्दाश्रम येथे भेट घेत ‍विचारपूस केली. वृध्द कलावंत म्हणून शांताबाईंचा शासनाच्या वतीने योग्य तो सन्मान राखत शासकीय योजनांचा लाभ त्यांना मंजूर केला जाईल. असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.  

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही शांताबाईंच्या प्रकृतीची समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून विचारपूस केली. त्यांना सर्वतोपरी शासकीय मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्या. मागील दोन ‍दिवसापासून शांताबाईंची वृध्दापकाळात परवड सुरू असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या. माजी आमदार स्नेहलता कोल्हे, द्वारकामाई ट्रस्टचे सल्लागार सचिन तांबे व डॉ. अशोक गावित्रे यांनी त्यांना २४ जून रोजी द्वारकामाई वृध्दाश्रमात दाखल केले होते. 

जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्यासोबत जिल्हा प्रशासनाच्या महसूल, समाज कल्याण,  नगरपालिका, पंचायती समिती या विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिर्डी येथील द्वारकामाई वृध्दाश्रमात भेट घेतली. शांताबाई लोंढे सध्या त्यांचे भाचे कोंडीराम मार्तंड लोंढे व राजू मार्तंड लोंढे यांच्या समवेत गजानन नगर, कोपरगाव येथे राहात होत्या. ते त्यांची सांभाळ करीत आहेत. परंतु वार्धक्य व त्यांची मानसिक आवस्था वेळोवेळी विचलीत होत असल्याने ते बऱ्याच वेळा घराच्या बाहेर राहात असल्याची माहिती त्यांच्या नातलगांनी दिली.  यापुढे त्या द्वारकामाई वृद्धाश्रम येथेच निवास करणार आहेत. त्यांची प्रकृती व्यवस्थित असून त्यांच्यावरील पुढील वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत. 

शांताबाई लोंढे-कोपरगांवकर यांना महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कला संचलनालय, मुंबई यांची वृद्ध कलावंत मानधन योजना सन- २००९ पासून त्यांना वर्ग 'क' कलाकार म्हणून दर महिन्याला २२५०  रुपये मानधन मिळत आहे. त्यांचे  में २०२३ महिन्याचे मानधन त्यांच्या स्टेट बॅक इंडियाच्या बॅंक खात्यावर ८ जून २०२३ रोजी जमा झाले आहे. असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांनी यावेळी सांगितले. 

ज्येष्ठ तमाशा कलावंत श्रीमती शांताबाई लोंढे (कोपरगावकर) यांना कोपरगाव तहसीलदारांनी संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मंजूर केला आहे‌. त्यानूसार त्यांना एक हजार रूपये दरमहा मानधन मिळणार आहे. दुबार रेशनकार्ड जिवित व ऑनलाईन करून शासनाच्या नियमाप्रमाणे अंत्योदय योजनेचा लाभ, तसेच केंद्र पुरुस्कृत कलाकार मानधन योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. घरकुल योजनेचा लाभ देण्याबाबत कोपरगाव नगरपालिका मुख्याधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. असेही  जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितले. प्रशासनाने त्यांच्या प्रकृतीची आस्थवाईकपणे केलेल्या चौकशीमुळे त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. 

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे, शिर्डी प्रांताधिकारी माणिक आहेर, कोपरगाव तहसीलदार संदीपकुमार भोसले, राहाता तहसीलदार अमोल मोरे, कोपरगाव गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, कोपरगाव मुख्याधिकारी शांताराम गोसावी, विस्तार अधिकारी बी. बी. वाघमोडे, समाजकल्याण निरीक्षक विनोद लाड, द्वारकामाई वृध्दाश्रमचे व्यवस्थापक बी. श्रीनिवास, सल्लागार सचिन तांबे, सामाजिक कार्यकर्त सुखलाल गांगवे आदी उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !