◻️ योगाचार्य संजय चोळके यांच्या मार्गदर्शनाखाली योगाची प्रात्यक्षिके
संगमनेर LIVE (लोणी) | योग साधनेची परंपरा आणि संस्कृती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविली, मानवी मनाची एकाग्रता, स्वाथ्य आणि आनंद या साधनेत आहे. अंतरराष्ट्रीय स्तरावर या साधनेचे आधोरेखित झालेले महत्व पाहाता भारताने जगाला अमुल्य ठेवा दिला असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
९ व्या अंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालयात सामुहीक योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संजय टंडन, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्यासह प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सर्व प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. योगाचार्य संजय चोळके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी योगाची प्रात्यक्षिक केली.
याप्रसंगी शुभेच्छा देतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की, ९ वर्षांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योग साधनेला अंतरराष्ट्रीय स्तराववर पोहोचविण्याचा प्रयत्न केला. आज जगातील १७७ देशांमध्ये ही योग साधना केली जात आहे. संपूर्ण जगात या योग साधनेचे महत्व विषद झाले आहे. यंदाच्या योगदिनाची संकल्पना ही वसुधैव कुटूंबकम् अशी होती त्यामुळेच आता संपूर्ण विश्व या साधनेशी जोडले गेले आहे. मानवी मनाची एकाग्रता, स्वाथ्य आणि आनंद या साधनेतच दडलेले असल्यामुळे भारताने जगाला दिलेला हा अमुल्य ठेवा असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपा नेते संजय टंडन म्हणाले की, योग साधना हा व्यायाम प्रकार नसून आत्मा आणि शरीर यांना बळकट करण्याची साधना आहे. देशाची ही संस्कृती, परंपरा आज जगामध्ये पोहोचली आहे याचा सर्वांनाच अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.