◻️ चिमुकल्याच्या योगासनाने वेधले उपस्थिताचे लक्ष
संगमनेर LIVE | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी या दिनाला मान्यता दिली होती. त्यामुळे मोठ्या उत्साही वातावरणात संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथिल जिल्हापरिषद शाळेत ९ वा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला असून यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यानी केलेल्या योगासनाने उपस्थितांचे लक्ष वेधले होते.
बुधवारी ९ वा योग दिन असल्याने सरासरी ७ ते १२ वयोगटातील चिमुकले विद्यार्थी सकाळीचं शाळेत दाखल झाले होते. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका विजया भुसाळ - वाडेकर यांनी माहिती देताना सांगितले की, २१ जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. तर दक्षिण गोलार्धातील हा दिवस सर्वात लहान असतो. त्यामुळे जगभरातील अनेक भागामध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. दररोज योगा केल्याने तुमच्या शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. शरीर आणि मन शांत करण्यासाठी योगा खूप फायदेशीर मानला जातो. योग केल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते. स्नायूंची ताकद वाढते. तसेच यामुळे तुमची श्वसन, ऊर्जा आणि चैतन्य सुधारते. असे सांगून विद्यार्थ्याना योगाचे महत्त्व पटवून दिले.
दरम्यान याप्रसंगी शिक्षक रामराव देशमुख, शिक्षिका वैशाली पाबळ यांनी विद्यार्थ्यानकडून शारीरिक व्यायाम व हालचाली आणि योगासने करुन घेतली. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यामध्ये शाळेच्या मदतनीस सविता ननवरे व नौशाद शेख यांनी देखील सहभाग नोंदवला होता. दरम्यान जिल्हापरिषद शाळेने योग दिनाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थांनी शिक्षक व मुलाचे कौतुक केले आहे.