◻️ श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज अहमदनगर जिल्ह्यात आगमन
◻️ सुमारे वीस हजार वारकरी दिंडीमध्ये सहभागी
संगमनेर LIVE | शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज अहमदनगर जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी अत्यंत भक्तीमय वातावरणात कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी या पालखीचे स्वागत व पूजन केले
पारेगाव बु येथे पंढरपूर साठी निघालेल्या या पालखीचे सुमारे वीस हजार वारकऱ्यांसमवेत आगमन झाले. यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात यांनी पालखीचे पूजन केले. याप्रसंगी समवेत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, डॉ. दत्तात्रय गडाख, त्र्यंबकराव गडाख, रावसाहेब गडाख, साहेबराव गडाख, सौ. संध्याताई गडाख, सोपानराव येलके, सोमनाथ गडाख आदींसह विविध पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
सुमारे वीस हजार वारकरी या दिंडीमध्ये सहभागी झालेले आहेत. मोठ्या आनंदाने व भक्तिभावाने या वारकऱ्यांनी हरिनामाचा गजर करत टाळ मृदुंगाच्या तालावर विविध अभंग गात अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश केला. लेझीम पथक, पारंपारिक वाद्य व वेशभूषा करून गावकऱ्यांनी व विद्यार्थ्यांनी या पालखीचे स्वागत केले.
यावेळी बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. वारकरी संप्रदाय हा हजारो वर्षांपूर्वीच असून सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. जात-पात धर्म हा कोणताही भेदभाव या संप्रदायात नाही आमदार बाळासाहेब थोरात हे वारकरी संप्रदायाचे पाईक आहेत
विठ्ठलाची पायी वारी ही महाराष्ट्राची मोठी संस्कृती असून यामध्ये गोरगरीब लहान थोर सर्व सहभागी झालेले असतात. भेदभाव विसरून एकत्र येऊन आनंदाने तल्लीन होऊन पांडुरंगाच्या चरणी लीन होतात. ही महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक व धार्मिक परंपरा असून यावर्षीही राज्यात भरपूर पाऊस पडू दे शेतकरी सुखी होऊ दे अशी प्रार्थना ही कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी यावेळी केली.
विविध वारकऱ्यांनी फुगडी खेळत डोक्यावर तुळशी वृंदावन घेत डॉक्टर जयश्रीताई थोरात यांच्या समवेत अभंग गायले हरिनामाचा गजर आणि भक्तीमय वातावरणाने सर्व परिसर दुमदुमून गेला होता.