◻️ विस्तार आधिकाऱ्याच्या आश्वासनानतंर आंदोलन स्थगित
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर ग्रामपंचायतीकडून विकास कामामध्ये सुरु असलेल्या अनागोंदी कारभाराविरोधात नूकताचं ग्रामस्थांनी मोर्चा काढून ग्रामपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन केले. याप्रसंगी आलेल्या आंदोलकांच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी गावच्या सरपंच हजर न राहिल्यामुळे आंदोलक आक्रमक झाले होते.
यावेळी संगमनेर पंचायत समितीचे वरिष्ठ विस्तार अधिकारी ठाकूर यांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांना शांततेचे आवाहन करत आंदोलकानी केलेल्या विकास कामाबाबत तसेच इतर मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलकानी मोर्चा स्थगित केला आहे.
यावेळी रिपाईचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, तरुण सामाजिक कार्यकर्ते अँड. रविंद्र शेळके व माजी उप सरपंच नानासाहेब उंबरकर यांनी आपल्या मागण्या मांडताना ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले असून ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यावर विविध गंभीर आरोप करत चौकशीची मागणी केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोमवार दि. २६ जून रोजी विविध मागण्यासाठी उंबरी बाळापूर ग्रामपंचायतीवर ग्रामस्थांनी मोर्चा काढला होता. यामुळे आंदोलकाच्या मागण्यांबाबत उत्तर देण्याकरीता सरपंच यांनी ग्रामपंचायतीत उपस्थित राहणे आवश्यक होते. मात्र सरपंच आंदोलन स्थळी उपस्थित न राहिल्याने संतापलेल्या आंदोलकानी आक्रमक पवित्रा घेत ग्रामपंचायतीसमोरचं ठिय्या आंदोलन सुरु केले.
त्यामुळे ग्रामसेवक किशोर मांढरे यांनी या आंदोलनाची कल्पना पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे घटनेचे गांभीर्य ओळखून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ठाकूर यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन आक्रमक झालेल्या आंदोलकांच्या मागण्या जाणून घेतल्या. यावेळी आंदोलकांनी लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उठणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने ठाकूर यांनी मागण्या बाबत लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी शांततेत हा मोर्चा स्थगित केला आहे.
दरम्यान यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आंदोलकानी घोषणाबाजी केली. तसेच यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस पाटील वैशाली मैड, आश्वी पोलीस ठाण्याच्या गोपनीय विभागाचे हवालदार विनोद गभिंरे व त्याचे सहकारी उपस्थित होते.