संगमनेर LIVE (संजय गायकवाड) | स्त्री-पुरुष समानतेच्या कितीही गप्पा मारल्या तरी आजही जन्माला येणाऱ्या मुलीचे व मुलाचे स्वागत शहरी व ग्रामीण भागांत वेगवेगळ्या पद्धतीने होते हे नाकारता येणार नाही. या परिस्थितीवर मात करत संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल यादव कुटुंबियानी आपल्या घरात जन्माला आलेल्या मुलीच्या जन्माचे स्वागत जल्लोशात करत सुखद धक्का दिला. यावेळी आपल्या कन्यारत्नाचे फटाक्याची आतिषबाजीसह फुलाच्या वर्षावात मिरवणूक काढून धुमधडाक्यात स्वागंत केल्यामुळे उपस्थित ग्रामस्थं व नातेवाईक भारावून गेल्याचे चित्र रविवारी सांयकाळी पहावयास मिळाले.
मुलगी झाली म्हणून नाराज होणारा वर्ग आता खेड्यातसुद्धा राहिलेला नाही. आश्वी खुर्द येथील रहिवासी प्रवरा सहकारी बँकेत अधिकारी असलेले जगन्नाथ यादव यांचा मुलगा प. पु. पुंजाई माता ट्रस्टचे सदस्य जंयत यादव व सुन सौ. कोमल जयंत यादव हे दोघेही उच्च शिक्षित असून त्याना नुकतेचं कन्यारत्नं प्राप्त झाले. त्यामुळे अती आनंद झालेल्या यादव कुटुंबाने स्त्री जन्माचे अनोख्या पद्धतीने घरात स्वागत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार रविवारी कन्यारत्नाच्या स्वागतासाठी रांगोळ्याच्या पायघड्या घालण्याबरोबरचं औक्षण व मिठाईचे वाटप करुन राजेशाही थाटात आपल्या कन्येचे स्वागत केल्याने आश्वी खुर्द येथिल ग्रामस्थासह नातेवाईक व मित्रपरिवाराचेही डोळे दिपून गेले होते.
मुलगा - मुलगी असा भेद न करता समाजात एक चांगला संदेश देण्याचे काम यानिमित्ताने आजी विजया यादव, हेमलता यादव, पंजी श्रीमती बेबीताई यादव, आत्या जयश्री सावंत, राजेंद्र यादव, उज्वला यादव, साक्षी वाणी, वैष्णवी वाणी, सविता बिडवे, मिणा लकारे, आश्वीनी तक्ते, नम्रता बागुल, दत्तात्रय यादव, महेंद्र सांवत, महेश यादव, योगेश यादव, हर्षद बागुल, श्रीकांत तक्ते आदिसह यादव कुटुंबातील सदंस्यानी केले आहे.
यावेळी आपल्या लेकींचा गृहप्रवेश करताना मुलींची पावले कुंकूच्या पाण्यात ठेवून यादव कुटुंबाने घरात आगमन केले. आजोबा जगन्नाथ यादव हे प्रवरा सहकारी बँकेत कार्यरत असले तरी त्याच्यातील अजोबाने आपल्यातील कणखर स्वभावाला बाजूला ठेवून आपल्या नातीच्या आगमनावेळी फुलांचा वर्षाव करत स्वागत केल्याने तेथे उभ्या असलेल्या प्रत्येकेचे डोळे आपोआप पाणावले होते.
स्त्री-पुरुष जन्मदरात कमालीची तफावत निर्माण झाली आहे. परिणामी, आज लग्नाला मुली मिळत नाही. आम्ही भाग्यवान आहोत की आमच्या घरी लक्ष्मी आली. तिचे स्वागत करण्याचे भाग्य आम्हाला लाभले. पुरुष करतात ती सर्व कामे स्रीया काकणभर सरसपणे करतात. मुलगा किंवा मुलगी असा भेद करण्यापेक्षा ते आपले मूल आहे हे लक्षात घेऊन वाढवायला हवे. त्याला उच्च शिक्षण, चागले आरोग्य व चागले भविष्य देण्याचा नेटाने प्रयत्न प्रत्येक कुटुंबातून झाल्यास भविष्यात मुलीच्या कार्यकर्तुत्वातून त्या कुटुंबाला समाजात वेगळी ओळख मिळाल्याशिवाय राहणार नसल्याची भावना आजोबा जगन्नाथ यादव यानी व्यक्तं केली.