◻️ सोन्याचांदीचे दागिने, गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह आरोपी ताब्यात
◻️ स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी येथिल प्रसाद पंडीतराव नांदुरकर (वय - ५०) हे त्यांचे सराफ दुकानातील सोन्या चांदीचे दागिने पिशवीमध्ये भरुन दुकान बंद करुन घरी जाताना पल्सर मोटार सायकलवर आलेल्या अनोळखी दोघानी त्याच्यां डोळ्यात मिरचीपुड टाकुन मारहाण करुन ७ लाख ६२ हजार१२५ रुपये किंमतीचे सोन्याचांदीचे दागिने बळजबरीने चोरुन नेले होते. त्यामुळे आश्वी पोलीस स्टेशन गु.र.नं. १५७/२०२३ भादविक ३९४, ३४ प्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटना घडल्यानंतर पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.
त्यानुसार पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई सोपान गोरे, मनोहर शेजवळ, पोहेकॉ मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, सचिन आडबल, विशाल दळवी, संतोष खैरे, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, पोकॉ शिवाजी ढाकणे, मेघराज कोल्हे, अमृत आढाव व प्रशांत राठोड अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथकसमवेत गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे सुरू केले.
नेवासा व सोनई परिसरात फिरुन आरोपींची माहिती घेत असताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, काही इसम पांढरे रंगाचे स्कॉर्पिओ गाडीमधुन संगमनेर येथील सराफाचे डोळ्यात मिरचीपुड टाकुन चोरी केलेले सोन्याचांदीचे दागिने, गावठीकट्टा व जिवंत काडतुस विक्री करण्यासाठी नेवासा फाटा येथे येणार आहेत. खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक आहेर यांनी पथकास कळवुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.
पथकाने लागलीच नेवासा फाटा (ता. नेवासा) येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना नेवासा ते नेवासा फाटा रोडने एक पांढरे रंगाची स्कॉर्पिओ येताना दिसली. पथकाची खात्री होताच स्कॉर्पिओ चालकास हात दाखवुन थांबण्याचा इशारा केला. मात्र स्कॉर्पिओ चालकास संशय आल्याने त्याने ताब्यातील स्कॉर्पिओ भरधाव वेगात अहमदनगरचे दिशेने घेवुन जावु लागला. पथकाने स्कॉर्पिओचा पाठलाग चालु केला व सदर स्कॉर्पिओ गाडी सुरेशनगर, त्रिवेणीश्वर कमानी जवळ, नेवासा फाटा, ता. नेवासा येथे आडवुन गाडीतील संशयीत इसमांना ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्याना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) खंडेश्वर ठोंबळ, (वय २३, शेवगांव), २) आकाश चौधरी (वय २३, शेवगांव) व ३) प्रमादे गायकवाड (वय ३३, श्रीरामपूर) असे असल्याचे सांगितले. त्यांची व स्कॉर्पिओ गाडीची झडती घेता त्यांचे अंगझडतीमध्ये एक गावठी बनावटीचा कट्टा व तीन जिवंत काडतुस व स्कॉर्पिओ गाडीचे झडतीमध्ये काळे रंगाचे बॅगेत विविध प्रकारचे सोन्याचे व चांदीचे दागिने मिळुन आले.
ताब्यातील इसमांकडे सोन्याचांदीचे दागिने, गावठी बनावटीचा कट्टा व जिवंत काडतुस या बाबत विचारपुस करता त्यांनी दिनांक २६/०६/२३ रोजी निमगांवजाळी, ता. संगमनेर येथील सोनाराचे दुकाना समोर पाळत ठेवुन सोनार दुकानबंद करुन निघाल्यानंतर त्याचा पल्सर मोटार सायकलवर साथीदारासह पाठलाग करुन डोळ्यात मिरचीपुड टाकुन लुटलेले सोन्याचांदीचे दागिने तसेच गावठी कट्टा व जिवंत काडतुस विक्री करण्यासाठी आलो असल्याची कबुली दिल्याने तिनही आरोपींना ताब्यात घेतले.
दरम्यान ताब्यात घेतलेल्या आरोपींचे कब्जातुन आश्वी पोलीस स्टेशन गु.र.नं. १५७/२०२३ भादविक ३९४, ३४ प्रमाणे दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेले ८,५०,४७२/- रुपये किंमतीचे विविध प्रकारचे सोन्याचांदीचे दानिगे, तसेच ३०,०००/- रुपये किंमतीचा एक गावठी बनावटीचा कट्टा, १,५००/- रुपये किंमतीचे तीन जिवंत काडतुस, ५,००,०००/- रुपये किंमतीची एक पांढरे रंगाची स्कॉर्पिओ गाडी व ४५,०००/- रुपये किंमतीचे एक विवो कंपनीचा व दोन सॅमसंग कंपनीचे मोबाईल फोन असा एकुण १४ लाख २६ हजार ९७२ रुपये किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. यावेळी पोना ज्ञानेश्वर नामदेव शिंदे, ने. स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. ७२४/२०२३ आर्म ऍ़क्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधिक्षक, श्रीमती. स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगांव विभागचे सुनिल पाटील यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.