संगमनेर LIVE (लोणी) | लांबलेला पाऊस आणि उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेवून भंडारादारा धरणातून शेती आणि पिण्याच्या पाण्याचे आवर्तन रविवारी संध्याकाळ पासूनच सोडण्याच्या सूचना महसूल तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
भंडादारा धरणात पाण्याची उपलब्धता आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयाप्रमाणे आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यास त्यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
यावर्षी पाऊस लांबल्याने लाभक्षेत्रातील काही गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत. शेती पीकांसाठी पाण्याची तीव्रता भेडसावू लागल्याने शेतकऱ्यांचे होणारे नूकसान टाळण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी अधिकाऱ्यासमवेत चर्चा केली. या आवर्तनाचा मोठा दिलासा शेतकरी आणि नागरीकांना मिळणार आहे.
त्यानूसार प्रवरेच्या लाभक्षेत्रात आवर्तनाचे नियोजन केले जाणार असून आवर्तनाच्या पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले आहे.