◻️ गणेश परिवर्तन मंडळाच्या प्रचाराचा शुभारंभ
◻️ नारायणराव कार्ले यांचे खळबळजनक वक्तव्य
संगमनेर LIVE (राहाता) | आम्ही येथे गणेश घडवण्यासाठी आलेलो आहोत, तुम्ही मताच्या रूपाने आम्हाला आशीर्वाद द्या, आम्हाला गणेश कारखाना हा संगमनेर आणि संजीवनी सारखा चालवायचा आहे, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखालील गणेश परिवर्तन मंडळाचा प्रचार शुभारंभ खंडोबा महाराज मंदिर वाकडी येथे पार पडला. यावेळी बाळासाहेब थोरात बोलत होते.
थोरात म्हणाले, ‘मी याच तालुक्यातील मतदार आहे. तुम्ही जिल्हाभर हुंदडता, मला पाहुणे कलाकार म्हणण्याचा अधिकार नाही. सभासदांच्या आग्रहाखातर आम्ही येथे आलो. गणेश कारखान्याची आठ वर्षात यांनी काय अवस्था करून ठेवली आहे, हे सर्वज्ञात आहे. कोणत्याही गोष्टींचा हिशेब नाही. आमच्यावर विश्वास ठेऊन मतदान करा, आमची भूमिका प्रामाणिक आहे. या भागातील शेतकरी आणि सभासदांच्या जीवनात चैतन्य निर्माण करण्याचे भाग्य आम्हाला मिळाले तर त्याचा आनंदच आहे.
सभासदांनी इच्छा व्यक्त केली की आम्ही संगमनेर किंवा संजीवनी सारखा भाव देऊ असे जाहीर करावे. प्रथमतः तुम्ही तुमची जबाबदारी पार पाडा हा कारखाना आमच्या ताब्यात द्या आम्ही इथे आलो आहे तर संगमनेर आणि संजीवनी सारखाच हा कारखाना चालवणार. आमच्या भूमिका स्पष्ट आहे, आम्ही राजकारणासाठी नाही तर या परिसरामध्ये पुन्हा एकदा गणेशचे धुराडे पूर्ण क्षमतेने पेटावे, सभासदांचा सन्मान राखावा यासाठी एकत्र आले आहोत.
गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष नारायण कार्ले म्हणाले, गणेश कारखाना हा आम्हाला धमकावून प्रवरेच्या नेतृत्वाने बळकावलेला आहे. गणेश कारखाना चालू नये अशी प्रवरेच्या नेतृत्वाची इच्छा होती, त्यासाठी सर्व बाजूने त्यांनी गणेशच्या संचालक मंडळाची नाकेबंदी केली होती. कोणतीही बँक आम्हाला कर्ज द्यायला तयार नव्हती. कारखान्याचे खोटे ऑडिट करून त्या ऑडिटच्या माध्यमातून संचालक मंडळाला तुरुंगात घालण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आणि आम्हाला करार करायला भाग पाडले.
आमच्या कारकिर्दीत आम्ही २२ लाख टनाचं गाळप केलं हे टीका करणाऱ्यांनी विसरू नये. राहिला प्रश्न स्पिरिट विक्रीचा तर संचालक मंडळाची बैठक घेऊन निविदा काढून पारदर्शी पद्धतीने आम्ही स्पिरीट विक्री केली आहे, काय चौकशा करायच्या त्या करा गणेशच्या विकासासाठी आणि गणेश वाचवण्यासाठी आमची लढाई आहे, आम्ही मागे हटणार नाही. कागदपत्रांची भाषा काय करता? आमच्याकडेही कागदपत्र आहेत, सर्व ऑडिट रिपोर्ट मी सांभाळून ठेवलेले आहेत.
विवेक कोल्हे म्हणाले, सभासदांनी माझी गाडी अडवली आणि आग्रह धरला की गणेशच्या निवडणुकीत लक्ष घालावे. आमच्या परिवाराच्या मागे बरेच व्याप आहेत, अनेक संस्थांवर जबाबदारी पूर्वक काम करावे लागते. मात्र सभासदांचा आग्रह मी डावलू शकलो नाही आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय झाला. राजकारणापेक्षा ही शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत आम्ही ही आघाडी केली. सभासद आणि शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी कोणत्याही प्रकारची राजकीय किंमत मोजायची माझी तयारी आहे. आम्ही प्रामाणिकपणे काम करणारी माणसं आहोत. ज्येष्ठ नेते आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेब यांनी आम्हाला संस्कार दिलेले आहेत, त्या संस्कारातूनच आम्ही भविष्यातही येथे काम करणार आहोत.
डॉ. गोंदकर म्हणाले, ‘अहवालांमधून आकड्यांचे गौडबंगल समोर येत आहे. कारखाना चालवायला देताना करारामध्ये जबाबी नमूद केलेल्या होत्या त्यांची पूर्तता प्रवरेने केलेली नाही. जर पूर्तता केलेली असती तर आज गणेश तोट्यात गेलाच नसता. याचा अर्थ प्रवरेमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार झालेला आहे हे नाकारून चालणार नाही.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जेष्ठ नेते शिवाजीराव कोते यांनी भूषविले. यावेळी करण ससाणे, सचिन गुजर, अरुण पाटील कडू, धनंजय जाधव, नानासाहेब शेळके, जयराज दंडवते आदींची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजीराव लहारे तर प्रास्ताविक विठ्ठलराव शेळके यांनी केले.