◻️ शनिवारी एकाच रात्री पुन्हा त्याच ठिकाणी पाच ते सहा व्यक्तीवर बिबट्याचा हल्ला
◻️ जखमीना रुग्णवाहिकेने पुढील उपचारासाठी नगरला पाठवले
◻️ बिबट्याच्या बंदोबस्तासाठी नाशिकहून विशेष पथक येणार ?
संगमनेर LlVE | संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द शिवारातील शिबलापूर - गुहा रस्त्यावर मागील काही दिवसांपासून बिबट्याकडून माणसावर हल्ल्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद होत नसल्याने वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची आक्रमक मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मागील काही दिवसांपासून दाढ खुर्द शिवारात बिबट्याने धुडगूस घालत मोठी दहशत निर्माण केली असून पंधरा दिवसांत सात ते आठ व्यक्तीवर या बिबट्याने हल्ला केला आहे. शुक्रवारची सकाळची घटना ताजी असताना शनिवारी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास त्याच ठिकाणाहून दुचाकीवरून प्रवास करताना पाच ते सहा जणावर बिबट्याने पुन्हा हल्ला करत जखमी केले आहे. यामध्ये दाढ बुद्रुक येथील दिगंबर कारभारी थोरात व त्याचा मुलगा तसेच मारुती नांगरे व त्याची पत्नी, शिवाजी सोमनाथ गिते व त्याचे वडील सोमनाथ गिते याचा समावेश असून हे सर्वजण दुचाकीवरून चालले होते.
त्यामुळे आक्रमक झालेल्या दाढ खुर्द ग्रामस्थांनी आता या बिबट्याचा बंदोबस्त करा अशी आक्रमक मागणी वनविभागाकडे केली आहे. यामध्ये सरपंच सतिश जोशी, सुनील जोशी, सुरेश जोरी, नितिन पाबळे, दीपक अंत्रे, रामदास जोशी, रविंद्र गिते, रोहिदास गिते, संदीप झनान, विजय पर्वत, दत्तु पर्वत, अनिल पर्वत यांचा समावेश असून त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन जखमींना मदत केली आहे.
दरम्यान याबाबत राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयाला याबाबत माहिती देण्यात आली असून या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी नाशिकवरुन विशेष पथक येणार असल्याची माहिती सरपंच सतिश जोशी यांनी दिली आहे. तर स्थानिक नागरिकांच्या मदतीने या जखमींवर दाढ बुद्रुक येथील आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेने नगर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे.