राज्यात आज घडलेली घटना लोकशाही आणि राज्यघटनेकरिता दुर्दैवी - बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
◻️ जनता सर्व पाहते आहे, जनतेच्या न्यायालयातच सगळा निर्णय होईल

संगमनेर LIVE | २०१४ पासून देशात लोकशाही व राज्यघटना त्याचबरोबर पक्षांतर बंदी कायद्यावर आघात होतो आहे हे काळजी करायला लावणारे आहे. राज्यात आज घडलेल्या घटना जनता सर्व पाहते आहे. याबाबत राज्यातील जनताच निर्णय करणार असून जनतेचा न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे. मात्र आजची घडलेली घटना ही लोकशाही व राज्यघटने करता दुर्दैवी असल्याची खंतही काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली असून राज्यातील जनता महाविकास आघाडी सोबत असल्याची प्रतिक्रिया ही त्यांनी दिली आहे.

राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मुंबईला रवाना होण्यापूर्वी माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, आजच्या शपथविधीची घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून लोकशाही व राज्यघटने करता ही दुर्दैवाची आहे. पुढील काळात देश कसा चालेल हे काळजी वाटण्यासारखे आहे. पक्ष, पद्धत ,विचार घेऊन आपण पुढे जातो. कायम सत्ता पाहिजे असा खेळ सुरू झाला तर लोकशाही व्यवस्था अडचणीत येईल.

मागील वर्षापासून राज्यात सुरू झालेला राजकीय खेळ, घडलेल्या सर्व घटना राज्यातील जनता पहात आहे. जनतेला असे राजकारण नको आहे. असे राजकारण जेव्हा जनतेच्या न्यायालय जाईल तेव्हा जनता योग्य निर्णय देईल. कारण जनतेचे न्यायालय हे सर्वश्रेष्ठ न्यायालय आहे. भाजपाची कार्यपद्धती ही सत्ता मिळवण्यासाठी काहीही करण्याची आहे. जे कालपर्यंत एकमेकांवर टीका करत होते. ते आज एकत्र आले आहे. त्यांच्या मागच्या वाक्यांची तुलना केली तर किती टोकाची होऊ शकते हे आता जनता पाहते.

राज्यात महाविकास आघाडीला अत्यंत अनुकूल वातावरण आहे लोकसभेला ३८ आणि विधानसभेला १८० जागा निवडून येण्याचा अंदाज विविध सर्वेनी दिला आहे. त्यामुळे भाजप अस्वस्थ आहे. आगामी काळात सत्ता मिळावी आणि टिकावी याकरता काहीही केले जात आहे. लोकशाहीची मोडतोड होत आहे. राष्ट्रवादीचे मोठे नेते सत्ते सोबत गेले हे नक्कीच काळजी वाटणारे आहे.

काँग्रेस व महाविकास आघाडीचा विचार हा लोकशाही व राज्यघटनेची बांधील असून आम्ही तो जपणार आहोत. जनता आमच्या सोबत असून अशा घडलेल्या घटनांमुळे जनतेचा विश्वास अजून महाविकास आघाडीवर भक्कम होऊन आगामी काळात राज्यात व देशात महाविकास आघाडीची सत्ता येईल असा ठाम विश्वासही आमदार थोरात यांनी व्यक्त केला आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !