तंत्रशिक्षण मंडळातर्फे प्रवरेच्या विखे पाटील पॉलिटेक्निकला ‘उत्कृष्ठ’ दर्जा
◻️प्राचार्य डॉ. विजयकुमार राठी यांची माहिती
संगमनेर LlVE (लोणी) | महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांचे वतीने तपासणी करून महाराष्ट्रातील प्रत्येक डिप्लोमा कॉलेजचा शैक्षणिक दर्जा नुकताच ठरवून दिलेला आहे. यामध्ये प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निक कॉलेजच्या सर्व अभ्यासक्रमांना ‘उत्कृष्ट दर्जा’ प्राप्त झाला असल्याची माहिती पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. विजयकुमार राठी यांनी दिली.
ए.आय.सी.टी.ई. मान्यताप्राप्त पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या (डिप्लोमा) संस्थांमधील शैक्षणिक बाबींची तपासणी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांनी समिती पाठवून प्रत्येक पॉलिटेक्निकची तपासणी केली. तपासणी करतांना संस्थेमध्ये उपलब्ध असणाऱ्या सोईसुविधा, प्राध्यापक, शैक्षणिक कामकाज, विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम, शैक्षणिक वातावरण इत्यादी बाबींचा विचार करून गुण दिले आहेत.
या तपासणीमध्ये पद्मश्री विखे पाटील पॉलिटेक्निकच्या कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल, केमिकल, सिव्हील, क्लाऊड कॉम्प्यिटींग अँण्ड बीग डेटा, मेकॅट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल या विभागांना उत्कृष्ठ दर्जा (एक्सलन्स ग्रेड) प्राप्त झालेला आहे. संस्थेचे अध्यक्ष व महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन तसेच प्राध्यापकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी वेळोवेळी केलेले परिश्रम व प्रयत्नांचे हे यश असल्याचे प्राचार्य डॉ. विजयकुमार राठी यांनी सांगितले. राज्यातील सर्व पॉलिटेक्निकची या प्रकारच्या वर्गवारीची माहिती विद्यार्थी व पालक यांना पाहण्यासाठी तंत्रशिक्षण मंडळाच्या www.msbte.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
दरम्यान पॉलिटेक्निकच्या या यशाबद्दल सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, विश्वस्त माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे सह सचिव भारत घोगरे, स अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ यांनी अभिनंदन केले.