◻️ सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात विद्या भवन येथे जागतिक लोकसंख्या दिन साजरा
संगमनेर LIVE | अमर्याद लोकसंख्या वाढ ही देशाच्या व जगाच्या विकासाला घातक आहे. या समस्येमुळे अनेक समस्या निर्माण होत असून शालेय स्तरापासून समाजातील सर्व घटकांमध्ये याबाबत जागृती निर्माण होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात यांनी केली आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात माध्यमिक विद्या भवन येथे जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त कार्यक्रमाचे बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका संगीता म्हस्के होत्या. व्यासपीठावर जयश्री कुलकर्णी, बेबी कवडे, नीता पाटील, सोमनाथ गांगुर्डे, इंद्रभान शिंदे, चांगदेव जोंधळे, विलास सोनवणे, दीपक आदमाने, उत्तम गवांदे आदि उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाबा खरात म्हणाले की, जागतिक लोकसंख्या ही जागतिक संकट आहे. दिवसेंदिवस विज्ञानाने प्रगती केली असून मृत्यू दर कमी होत आहे. मात्र लोकसंख्या वाढत राहते आहे. निरक्षरता, अंधश्रद्धा, अज्ञान, दारिद्र्य, बेकारी या समस्यांचे मूळ कारणे ही लोकसंख्येत आहे.
छोटे कुटुंब सुखी कुटुंब ही संकल्पना अधिक प्रभावीपणे राबवताना जी लोकसंख्या आहे त्यांच्या हाताला जास्तीत जास्त काम देऊन या टप्प्यावर लोकसंख्या वाढ रोखण्याचे प्रमुख उद्दिष्ट जगाने ठेवले पाहिजे. जमीन वाढत नसून तीच आहे. सजीव सृष्टी तीच आहे मात्र मानवाने केलेली प्रगती व भौतिक सुविधांसाठी पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत असून ते जपणेही गरजेचे आहे. लोकसंख्या वाढ रोखणे हे पर्यावरण संवर्धनाचे एक काम असल्याचेही ते म्हणाले.
संगीता म्हस्के म्हणाल्या की, दंडकारण्य अभियानातून पर्यावरण संवर्धनाचे मोठे काम होत असून लोकसंख्या वाढ ही जागतिक समस्या असून शिक्षण क्षेत्रामधून समाजात जागृती होणे गरजेचे आहे.
यावेळी प्रा बाबा खरात यांनी विविध पर्यावरण गीते गाताना “ रुणझुण त्या पाखरा रे रुणझुण त्या पाखरा जा माझ्या माहेरा” यांसह सादर केलेल्या विविध गीतांना विद्यार्थ्यांनी भरभरून दाद दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जैनुद्दीन तांबोळी यांनी केले राजू बड यांनी आभार मानले.