◻️ सहा आरोपीसह २ लाख ८३ हजाराचा मुद्देमाल जप्त
◻️ इतर चोऱ्यांच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता
संगमनेर LIVE (संजय साबळे) | मागील अनेक दिवसांपासून संगमनेर तालुक्यात चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे नगर जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक राकेश ओला व संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या सुचनानुसार गस्त घालण्याबरोबर नाकाबंदी करुन वाहणाची तपासणी करताना पोलीसांना पाहून पळून जाणाऱ्या टोळीला मोठ्या शिताफीने संगमनेर शहर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मागील अनेक दिवसांपासून संगमनेर तालुक्यात चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे नाकाबंदी करुन संशयित वाहणाची तपासणी करण्याचे काम १३ जुलै रोजी सायंकाळी ५.५० वाजेच्या सुमारास मच्छी चौक पावबाकी येथे सुरु होते. यावेळी एका संशयास्पद हालचाली असलेले वाहन नाकाबंदी केलेल्या कर्मचाऱ्याना हुलकावणी देऊन पळून चालले होते. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ या वाहनाचा पाठलाग करत मोठ्या शिताफीने यातील सहा व्यक्तींना पकडले. यावेळी त्याच्याकडे लाकडी दांडे, लोखंडी टॉमी, गंज, चारचाकी वाहन, लोखंडी कडे, साडी, मिर्ची पुड व रोख रक्कम असा २ लाख ८३ हजार १५० रुपयांचे दरोडा टाकण्याचे साहित्य मिळून आले आहे.
यावेळी पोलीसानी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये संजय मारुती शिंदे (वय - २५), ओंकार शंकर शेगर (वय - २३), सुनील बाबुराव सावंत (वय - ३२), राजेश शंकर शेगर (वय - २५), सिझन शिवलाल चव्हाण (वय - २५), किशोर महादेव इंगळे (वय - २१) या सहा जणांचा समावेश असून हे सर्वजण बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. तर हायवेवर साड्या घालुन गाड्या अडवून लुटणार असल्याचे त्यांनी पोलीस चौकशीत कबूल केले आहे.
त्यामुळे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुरंव ५७७/२०२३ नुसार भादंवी कलम ३९९ व ४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या सहाही आरोपींकडे असून चौकशी सुरु असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
दरम्यान ही कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार, पोहेकॉ विजय खाडे, पोना विजय पवार, पोकॉ विशाल कर्पे, रोहिदास शिरसाठ, अविनाश बर्डे, हरिश्चंद्र बाडे व आत्माराम पवार यांच्या पथकाने केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार हे करत आहे.