◻️ बेबी कोब्राचां दंश पण, डॉक्टराचे मार्गदर्शन व शिवाचे पुण्य आले काम
◻️ उपचारानंतर सर्पमित्र शिवा पवार सुखरूप घरी परतला
संगमनेर LIVE | आपण असे म्हणतो ना की तो वाचला. कारण त्याचा काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. हे अगदी तंतोतंत खरे ठरले आहे. संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील सर्पमित्र शिवप्रसाद उर्फ शिवा पवार यांच्याबाबत. तर असे म्हणण्यामागे कारण असे आहे की, आठ दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे लोकवस्तीतून वाचवलेले साप निसर्गात मुक्त करण्यासाठी गेलेल्या शिवाला यातील अती विषारी अशा बेबी कोब्राने दंश केला. त्यामुळे त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. चार ते पाच दिवस उपचार घेऊन आता शिवा बरा होऊन दवाखान्यातून घरी आला असल्यामुळे “काळ आला होता, पण वेळ आली नव्हती” हेचं वाक्य प्रत्येकाच्या तोडून ऐकवयास मिळत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सर्पमित्र शिवा प्रसाद हा मागील काही वर्षापासून सापाचे संरक्षण करण्याचे महत्त्वाचे काम करत आहे. या काळात त्याने शेकडो विषारी व बिनविषारी सापांना मानवी वस्तीतून पकडून निसर्गात मुक्त केले आहे. तो करत असलेल्या या कामामुळे आश्वी परिसरात अद्याप कोणतीही मोठी दुर्दैवी घटना घडलेली नाही.
सर्पमित्र शिवा पवार हा नेहमीप्रमाणे लोकवस्ती पकडलेले विषारी साप शुक्रवार दि. ७ जुलै रोजी सकाळी १० विजेच्या सुमारास निसर्गात मुक्त करण्यासाठी गेला होता. यावेळी दोन विषारी नागांना निसर्गात मुक्त केल्यानंतर नुकताच अंड्यातून बाहेर आलेल्या बेबी कोब्राची बरणीतून बाहेर सुटका करत असताना डोळ्यांची पापणी लवण्याअधिचं अतिशय चपळाईने या बेबी कोब्राने शिवाच्या हाताला दंश केला. परंतू सावध असल्याने चपळाईने शिवाने हात झटकला असला तरी निसटता दंश हा त्यांच्या हाताला झाल्यामुळे तात्काळ शिवाचा हात सुजण्यास सुरवात झाली होती.
यावेळी सर्पमित्र शिवा पवार याने प्रसंगावधान राखत आश्वी येथिल डॉ. अमेय गुणे व डॉ. अभिजित गायकवाड यांना फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली या दोन्ही डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. तब्बल पाच दिवस उपचार घेतल्यानंतर शिवा रुग्णालयातून घरी आला आहे. त्यामुळेचं “काळ आला होता, पण वेळ आली नव्हती” असे सर्वत्र बोलले जात आहे.
दरम्यान याबाबत माहिती देताना सर्पमित्र शिवा पवार याने सांगितले की, घडलेल्या घटनेवर माझा अद्यापही विश्वास बसत नसला तरी ते सत्य असल्यामुळे नाकारुन चालणार नाही. घटना घडल्यानंतर भिंती निर्माण होऊ नये यासाठी मी जास्त लोकांना याबाबत माहिती कळू दिली नाही. माझ्या रुग्णालयातील उपचारासाठी प्रा. संजय देशमुख, सखाराम भोसले, बाळासाहेब मुर्तडक आदिनी आर्थिक मदत केल्याचे सांगितले आहे.