◻️ जगभरातून पाच तर भारतातून वैष्णवी देवकर एकमेव विद्यार्थीनी
संगमनेर LIVE (कोल्हार) | कोल्हारच्या कृषि कन्याने पशुवैद्यकिय क्षेत्रात करीअर करत आम्ही मुलीही प्रत्येक क्षेत्रात पुढे असल्यांची प्रचिती दिली असून क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ जिल्हा सातारा येथील बी. व्ही. एस्सी अँड ए. एच. या पदवी अभ्यासक्रमाच्या आंतरवासिता कार्यक्रमात शिक्षण घेत असलेली कु. वैष्णवी नितीन देवकर हिची दुबई अश्व हॉस्पिटल दुबई येथे १ जुलै २०२३ ते १ जुन २०२४ या १ वर्षा करता जागतिक पातळीवरील आंतरवासिता कार्यक्रमासाठी निवड झाली आहे.
केंद्र शासन, महाराष्ट्र राज्य शासन आणि महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरच्या क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ यांच्या संयुक्त परवानगीमुळे कु. वैष्णवी नितीन देवकर हिला परदेशी आंतरवासिता कार्यक्रमाची संधी प्राप्त झाली आहे. महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. विलास आहेर यांनी कु. वैष्णवी नितीन देवकर चे महाविद्यालयातर्फे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
जागतिक पातळीवर विविध देशातील एकूण पाच विद्यार्थ्यांची निवड या आंतरवासिता कार्यक्रमासाठी केली जाते त्यामध्ये भारत देशातील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळ येथील कु. वैष्णवी नितीन देवकर हिची निवड झालेली असून भारत देशातून अशाप्रकारे निवड होणारी ती पहिलीच विद्यार्थीनी आहे. हे महाविद्यालयासाठी अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. विलास आहेर यांनी केले.
जागतिक पातळीवरील आंतरवासिता कार्यक्रमासाठी झालेल्या निवडीबद्दल महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील, खा. डाॅ. सुजय विखे पाटील सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
दरम्यान आम्ही मुली सर्वच क्षेत्रात पुढे आहोतं. आज पशुसंवर्धन विभागात करीअर करतांना आई सौ. सुरेखा आणि वडील नितीन व कु. मनिषा तांबे यांच्यामुळेच यश मिळालेले. निवड झाल्यानतंर ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा कार्यालयांची मोठी मद्दत झाली. याशिवाय महाविद्यालयाचे विशेष मार्गदर्शन केले. या संधीचा उपयोग हा पशुपालकांसाठी करणार असल्याचे वैष्णवीने मानस व्यक्त केला.