संगमनेर LIVE | शासकीय वाळू डेपोसाठी पहिल्या टप्प्यात उचलेल्या साडेतीन हजार ब्रास वाळू नंतर आता यापुढे एकही खडा वाळूचा न उचलू देण्याचा निर्धार संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथील ग्रामस्थांनी करत वाळू डेपोला विरोध केला. यासाठी झालेला मागील ठराव रद्द करत वाळू उपशाला परवानगी देऊन गावचे वाळवंट करायचे का असा संतप्त सवाल आयोजित ग्रामसभेत विचारण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, जलजीवन मिशन योजनेंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाची ग्रामस्थांना माहिती व्हावी यासाठी आश्वी बुद्रुक बाजारतळावर गुरुवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विविध विषयांवर चर्चा सुरु असतांना ऐनवेळी वाळू डेपो संदर्भात आलेल्या विषयावर कामगार तलाठी डी. बी. भालचीम माहीती देत होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थानी आक्रमक होऊन ‘वाळू उपशाला परवानगी देऊन गावचे वाळवंट करायचे का?’ असा संतप्त सवाल उपस्थित केला. तसेच प्रवरा नदीपात्रातुन यापुढे वाळुचा एक खडाही उचलु न देण्याचा निर्धार करत वाळू उपसा बंद करण्याचा ठराव संमत केला.
राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यानी वाळु माफीयांच्या जाचातुन सर्व सामान्य जनतेची होणारी लुट थांबवण्याबरोबरचं वाळूतस्कंरीतून तरुणांमध्ये वाढणारी गुन्हेगारी व व्यसनाधीनता संपवण्यासाठीच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून ६०० रुपये ब्रासने शासकीय डेपोतून वाळू उपलब्ध करुन देण्याचे धोरण राबविले. या धोरणाचे आश्वी बुद्रुक ग्रामस्थांनी स्वागत करत वाळू उपशाला परवांनगी दिल्यानतंर जलसंपदा विभागाच्या मोकळ्या जागेत साडेतीन हजार ब्रास वाळु प्रवरा नदीपात्रातुन उपसून वाळू डेपो सुरु करण्यात आला होता.
या डेपोतून प्राधान्य क्रमाने अकोला, संगमनेर, राहता व राहुरी तालुक्यातील घरकुलांना वाळु देऊन नंतर सर्व सामान्य जनतेसाठी वाळू खुली करण्यात आली. मात्र वाळू बुकींग ही संगमनेर येथील सेतु कार्यालयातून करून ती त्वरीत संपल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे आश्वी बुद्रुक ग्रामस्थांना डेपोतून वाळु मिळाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत संतापाला ग्रामसभेत वाट मोकळी करुन दिली. तर दुसऱ्या टप्प्यात वाळू डेपोतुन आठ हजार ब्रास वाळू उपसा होणार असल्याने ग्रामस्थांनी या वाळु उपशाला कडाडुन विरोध केला आहे.
यावेळी वाळूसाठा क्रमांक १ साठी यापूर्वी ग्रामसभेने दिलेला ठराव रद्द करुन पुढील काळात वाळू उपशाला परवानगी देऊ नये असा ठराव मांडण्यात आल्यामुळे उपस्थित काही ग्रामस्थांनी याला हारकत घेतली. परंतू दोन तास चाललेल्या बाचाबाची नंतर प्रशांत कोळपकर यांनी मांडलेल्या हरकतीच्या ठरावाला रमेश धर्माधिकारी यांनी अनुमोदन देत ठराव संमत करुन त्याची प्रत तहसीलदार कार्यालयाकडे पोहच करण्यात आली आहे.
दरम्यान या ग्रामसभेसाठी ग्रामविकास आधिकारी राकेश पाटील, प्रशासक आर. आर. ठाकुर, तलाठी डी. बी. भालचीम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यानंतर प्रशासन आश्वी येथील वाळू डेपोबाबत काय निर्णय घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.