संगमनेर LlVE | हरित सृष्टीच्या रक्षणासाठी पर्यावरण संवर्धन हे अत्यंत गरजेचे असून थोर स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या दंडकारण्य अभियानाच्या अठराव्या वर्षात विविध शाळांमधून जयहिंद लोक जागरचा पथक पर्यावरण गीतांमधून विद्यार्थ्यांमध्ये जागृती करत आहेत याचबरोबर एक विद्यार्थी दोन झाड अशी संवर्धनासह जबाबदारीची शपथ दिली जात आहे.
दंडकारण्य अभियानाच्या प्रचार अभियानात तळेगाव दिघे निमोन पारेगाव, धांदरफळ, निमगाव बुद्रुक, सांगवी, कोळवाडे या विविध शाळांमध्ये पर्यावरण गीतांचा कार्यक्रम झाला यावेळी आदिवासी सेवक प्रा बाबा खरात, शाहीर शिवाजी कांबळे, सत्यानंद कसाब ,यशवंत वर्पे, जगन्नाथ बर्डे, शिवराम बिडवे आदींनी विविध पर्यावरण गीते सादर केली.
यावेळी प्राध्यापक बाबा खरात म्हणाले की, लोकनेते आ. बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दंडकारण्य अभियानाचे ही १८ वे वर्ष आहे. या अभियानामुळे तालुक्यातील डोंगर हिरवीगार दिसू लागली आहेत. वृक्ष हे परमेश्वराची हिरवे हात आहे. त्यांना आपण जपलेच पाहिजे. वृक्षांना आपण जपले तर ते आपल्याला प्रेम देतात. मात्र आपण आपल्यावर प्रेम करणाऱ्या या वृक्षांना विसरतो आणि मग कोरोना दुष्काळ असे महाभयंकर संकटी ओढाहून घेतो.
विद्यार्थी हेच खरे वृक्षदूत असून प्रत्येक विद्यार्थ्याने कमीत कमी दोन वृक्ष लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी घ्यावी. यावेळी विद्यार्थ्यांना वृक्ष संवर्धनाची शपथ देण्यात आली. हिरव्या हिरव्या तरु वेलींनी परिसर आपला सजवूया झाडेच झाडे लावूया, हे गीत सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने एकत्रित गायले याचबरोबर धरतीची आम्ही लेकरे भाग्यवान धरतीची आम्ही लेकरे, काळी माती आई, टिकाऊ खोरे घेऊन हाती जाऊया डोंगराला अशा विविध पर्यावरण गीतांनी शाळांचा परिसर दुमदुमून गेला.
पांडुरंग घुले म्हणाले की, दंडकारण्य अभियान ही लोक चळवळ ठरली असून यामध्ये तालुक्यातील सर्व नागरिकांनी सहभाग घ्यावा विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घेऊन गायलेली गीते ही पर्यावरण जागृतीसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत असून दंडकारण्य अभियानाच्या प्रचार आणि प्रसाराला नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.