◻️ शासनाकडून राजकारणासाठी मंजूर झालेल्या विकास कामांना स्थगिती
◻️ पाठपुरावा करून स्थगिती उठवल्याने विकास कामे पुन्हा पूर्ववत
◻️ रणखामवाडी ते कुंभारवाडी वरवंडी व दरेवाडी ते कवठे मलकापूर या रस्त्यांच्या कामाच्या शुभारंभ
संगमनेर LIVE | भाजपा हा धर्माच्या नावावर राजकारण करत असून शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी हा पक्ष त्यांनी फोडला आहे. हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असून हे महाराष्ट्रातील जनतेला मान्य झालेले नाही. राज्यघटना व लोकशाही वर विश्वास असलेल्या काँग्रेस पक्षाला आगामी काळ चांगला आहे. फक्त राजकारणासाठी मंजूर झालेल्या विकास कामांना विद्यमान सरकारने स्थगिती दिली होती .मात्र याबाबत विधानसभेत आवाज उठवल्याने पुन्हा विकास कामे सुरू झाले असल्याचे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
आमदार थोरात यांच्या पाठपुराव्यातून झालेल्या रणखामवाडी ते कुंभारवाडी वरवंडी व दरेवाडी ते कवठे मलकापूर या रस्त्यांच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर खेमनर, अजय फटांगरे, इंद्रजीत खेमनर, तुकाराम दातीर, पांडुरंग दातीर, माधव दातीर, भाऊसाहेब डोलनर, अण्णासाहेब कुदनर, जयराम ढेरंगे, गणेश सुपेकर, सुदाम सागर, बाबाजी गुळवे, हौशीराम खेमनर, पुष्पाताई गुळवे, राहुल गंभीरे आदींसह पठार भागातील विविध कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार थोरात यांच्या हस्ते १६ कोटी ८ लाख रुपये निधीच्या रस्त्यांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, मविआ सरकारच्या काळामध्ये आपण तालुक्यातील विविध रस्त्यांसह पठार भागातील अनेक रस्ते मंजूर करून घेतले होते. मात्र सरकार बदलले आणि नव्या सरकारने मंजूर झालेल्या कामांना स्थगिती दिली. या स्थगीतीबाबत आपण सातत्याने आवाज उठवल्याने सरकारने आताही स्थगिती उठवली आहे. आपण कायम विकासात्मक दृष्टिकोन ठेवून काम केल्याने सत्ताधारी व विरोधातील मंत्रीही आपला सन्मान करतात. त्याला फक्त काही अपवाद आहेत. शासकीय अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांना या विकास कामांसाठी येण्याचे बंधन घालने चुकीचे आहे.
भाजप हा धर्माच्या नावावर राजकारण करत असून त्यांचे फोडाफोडीचे राजकारण जनतेला मान्य नाही. वाढलेली बेरोजगारी, महागाई यावर जनता नाराज असून मणिपूरमध्ये घडलेली घटना ही संपूर्ण मानव जातीसाठी अत्यंत वेदनादायी आहे. देशात अस्थिर वातावरण असून आगामी काळा हा काँग्रेसचाच राहणार आहे.
संगमनेर तालुका हा विकासातून पुढे जात असून सर्व सहकारी, शैक्षणिक संस्था व सातत्याने होत असलेली विकास कामे यामुळे संगमनेर तालुका हा इतरांसाठी आदर्शवत ठरला आहे. १७१ गावे व २५८ वाड्यावस्त्या असलेल्या तालुक्याचा विस्तार मोठा असून प्रत्येक गावात विकास कामे राबवली जात असल्याचेही आमदार थोरात म्हणाले
शंकर पाटील खेमनर म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भागात १५ कोटींच्या रस्त्याला मंजुरी मिळवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. रणखांब ते खांबा हा पहिला कामाचा टप्पा सुरू होत असून या परिसरात अनेक विकास कामे आमदार थोरात यांच्या पुढाकारातून राबवली जात आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांवर विधानसभेत आमदार थोरात यांनी विद्यमान सरकारला घेतल्यानंतर या सरकारची मोठी भंबेरी उडाली असल्याची ते म्हणाले.
आमदार थोरात यांची पारंपारिक पद्धतीने मिरवणूक..
शेतकऱ्यांचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत सातत्याने शेतकऱ्यांच्या व सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी मोठा आवाज उठवला आहे. आज पठार भागातील रणखांबवाडी, रणखांब, कवठे मलकापूर, दरेवाडी यांसह विविध गावांमध्ये आमदार थोरात पारंपारिक पद्धतीने भव्य मिरवणूक काढून नागरिक, महिला व युवकांनी जोरदार स्वागत केले.