संगमनेर LIVE (कोल्हार) | पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी १९७६ मध्ये लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आज मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतर झालेले आहे. या वृक्षाची फळे आज हजारो विद्यार्थी चाखीत आहेत. प्रवरेने नेहमी विद्यार्थ्यांना उत्तम उत्तम ज्ञान देण्याचा प्रयत्न केला असून त्याचाच परिणाम म्हणून आज अमेरिकेसारख्या अनेक प्रगत राष्ट्रांमध्ये हजारोंच्या संख्येने प्रवरेचे विद्यार्थी उच्चपदस्थ अधिकारी म्हणून सेवा बजावीत आहेत.
केवळ मुलेच नाहीत तर मुली देखील मोठ्या संख्येने अनेक शहरांमध्ये जगातील अनेक नामवंत शहरांमध्ये आपले कर्तव्य बजावित आहे. या विद्यालयाचे विद्यार्थी जीवनात येणाऱ्या अनेक समस्यांना सक्षमपणे सामोरे जातात. त्यामुळे प्रवरा हायस्कूलमुळे विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये अमुलाग्र बदल झाला असल्याचे जिल्हापरिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी म्हटले आहे.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा हायस्कूल कोल्हार या सीबीएसई शाळेमध्ये आज ४७ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला . याप्रसंगी शालिनीताई विखे पाटील बोलत होत्या.
पुणे येथील इंजिनियर आणि शाळेची माजी विद्यार्थिनी अमृता भाऊसाहेब खर्डे हिने देखील याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, विद्यार्थ्याना जीवनामध्ये कसोशीने प्रयत्नपूर्वक यश मिळवता येते. शहरांच्या तुलनेमध्ये ग्रामीण भागातील शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण उपलब्ध आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज मी सक्षमपणे एका नामांकित कंपनीमध्ये अधिकारी म्हणून काम करत आहे. प्रवरा हायस्कूलने मला बालवयातच नेतृत्वाचे धडे दिले त्यामुळे मी आज समाजामध्ये ताट मानेने कार्यरत असल्याचे सांगितले.
याप्रसंगी शाळेचे स्थानिक स्कूल कमिटीचे उपाध्यक्ष अशोक असावा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण सर्वजण सीबीएसई अभ्यासक्रम शिकत आहात आणि त्यासाठी प्रत्येकाने उत्तमरीत्या तयारी करणे आवश्यक आहे. शाळेचे माजी विद्यार्थी ज्याप्रमाणे आज प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयामध्ये सन्मानाने येतात त्याच रीतीने आपण देखील प्रयत्नपूर्वक अभ्यास करून भविष्यामध्ये हा सन्मान प्राप्त करून घ्यावा. स्थानिक स्कूल कमिटी विद्यालयाला नेहमी मार्गदर्शन करीत असते. शाळेत येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सर्व समिती सदस्य हिरारीने भाग घेतात असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे प्राचार्य सुधीर मोरे यांनी मनोगत व्यक्त करताना प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि स्वागत केले. या कार्यक्रमासाठी शाळेचे माजी विद्यार्थी आणि पशुसंवर्धन व पशुसंवर्धन विभागाचे प्रमुख डाॅ. शिवम निर्मळ, सिद्धार्थ खर्डे उपस्थित होते. याप्रसंगी माजी विद्यार्थी आणि दहावी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमासाठी संभाजी देवकर, सुनील शिंदे, आबासाहेब राऊत, प्रशांत खर्डे, राजेंद्र राऊत, सौ. अर्चना खर्डे पाटील, गोरक्षनाथ खर्डे पाटील, ईलियाझभाई शेख आदिसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. सिद्धी दांडगे हिने केले तर आभार कु. स्मरणिका दळे हिने मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रमोद काळे, सौ. उल्का आहेर, संदीप आहेर, सौ. जया खर्डे, सौ. कविता दळे, कदीर शेख आदिनी परिश्रम घेतले.