◻️ पाच पिंजरे लावून वनविभागाचे कर्मचारी बिबट्या जेरबंद करण्यासाठी तळ ठोकून
◻️ तरसाच्या वावरामुळे बिबट्ये पिंजऱ्यात अडकेनात?
संगमनेर LlVE | जंगलातील हिंस्र प्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे वाढला आहे. त्यामुळे बिबट्यासारखा जंगली प्राणी कुठेही, कोणत्याही वेळी पहायला मिळणे हे संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदी पट्ट्यातील गावांमधील नेहमीचे चित्र आहे. हे वन्य प्राणी मानवी वस्तीत येऊन शेतकऱ्यांचे पशुधनावर हल्ला करत होते. आता हे बिबट्ये दबा धरुन मानसावर हल्ले करत असल्याच्या घटनांमध्ये मागील दोन महिन्यांमध्ये प्रचंड वाढ झाली असतानाचं दाढ खुर्द येथे दोन तरसाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे बिबट्या पाठोपाठ परिसरात तरसाची दहशत निर्माण होण्याची शक्यता आहे.
मागील दोन महिन्यांपासून दाढ खुर्द शिवारात बिबट्या या हिंस्र प्राण्यांची दहशत पहायला मिळत आहे. हा धोकादायक प्राणी बिनधास्तपणे वावरत असून अनेक मनुष्यावर या बिबट्याने हल्ला केला आहे. हल्ला झाल्यानंतरचे अनेक फोटो व व्हिडीओदेखील समाजमाध्यमातून वायरल होत आहेत. मात्र दिवसेंदिवस अशा घटनांध्ये वाढ होत आहे.
दाढ खुर्द मध्ये बिबट्यांची दहशत सुरु असतानाचं बुधवार व गुरुवारी एक नव्हे तर दोन तरस फिरताना दिसले. त्यांचं हे भितीदायक दृश्य शेतकऱ्यांने कॅमेऱ्यात कैद केलं आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून घराबाहेर कसं पडायचं या चिंतेत ग्रामस्थ आहेत.
वनविभाग मागील आठ दिवसांपासून मनुष्यावर हल्ले करणारा बिबट्या जेरबंद करण्यासाठी दाढ खुर्द शिवारात तळ ठोकून आहेत. बिबट्यासाठी परिसरात तब्बल पाच पिंजरे लावुन त्यामध्ये भक्ष्य ठेवूनही हा बिबट्या वन कर्मचाऱ्यांना हुलकावणी देत आहे. त्यामुळे आधीच दहशतीखाली असलेल्या नागरीकानपुढे दोन दिवसांपासून दाढ खुर्द शिवारात दोन तरस दिसल्याचा फोटो वायरल झाल्यामुळे नवे संकट उभे राहिले आहे.
तर पाबळे वस्ती व गिते वस्तीजवळ ही बिबट्ये मुक्तसंचार करताना नागरीकांना नजरेस पडले आहेत. तसेच गोकुळ गिते यांच्या शेतात त्यांनी दोन बिबट्ये व तीन तरस पाहिले असल्याची माहिती सरपंच सतिश जोशी यांनी दिली.
दरम्यान परिसरातील रंभाजी चिमाजी जोशी, बाबुराव गेणू जोशी, पांडुरंग एकनाथ जोशी, विजय बबन कहार, गोकुळ नामदेव गिते यांच्या शेतात पाच पिंजरे व त्यामध्ये भक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे बहुधा शेळ्या व कुत्रे ठेवल्यामुळे या पिंजऱ्याच्या अवतीभवती रात्री तरसाच्या वावर वाढला असण्याची शक्यता असल्यामुळेचं हल्लेखोर बिबट्या हा या पिजंऱ्यात जेरबंद होत नसावा अशी शक्यता वनविभागाने बोलुन दाखवली आहे. त्यामुळे संकट टळण्याऐवजी ते अधिक गडद झाल्याचे चित्र संध्या परिसरात पाहवयास मिळत आहे.