◻️ आश्वी पोलीसांनी आवघ्या काही तासांतच मध्यरात्री आवळल्या आरोपीच्या मुसक्या
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहिल्यांदाचं जादुटोणा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून यांचं घटनेतील आरोपींविरुद्ध बलात्काराचा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तर पोलिसांनी सापळा लावून अवघ्या काही तासांतच मध्यरात्री या आरोपीच्या मुसक्या आवळल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत आश्वी पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, सादतपूर शिवारात उदरनिर्वाह करण्यासाठी बाहेरुन एक कुटुंब आले आहे. येथे हे कुटुंब दुसऱ्याची शेती वाट्याने करुन प्रपंच चालवत होते. परंतू या कुटुंबाला मागील काही दिवसांपासून अनेक घरगुती अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे नातेवाईकाच्या माध्यमातून ओळख झालेल्या शिवाजी पांडे (रा. शिरापूर, ता. संगमनेर) याने या कुटुंबाला होम हवन करुन तुमची अडचणीतून सुटका करुन देतो असे सांगितले. त्यामुळे या भोंदू बाबांबरोबर या कुटुंबाची ओळख वाढली होती.
यांचं ओळखीचा फायदा घेत भोंदू बाबा शिवाजी पांडे हा सोमवार दि. ३१ जुलै रोजी सादतपूर या ठिकाणी आला होता. यावेळी घरातील महिलेचा पती हा कामानिमित्त शेतात गेल्याचा फायदा घेऊन या भोंदू बाबाने घरात एकट्या असलेल्या महिलेच्या अंगावर उदी सदृष्य पदार्थ टाकून या महिलेच्या मनाविरुद्ध बलात्कार केला होता.
याबाबत या पिडीत महिलेने आश्वी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा रंजिस्टर नंबर १८३/२०२३ नुसार भादंवी कलम ३७६ तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालणे व त्यांचे समुळ उच्चाटन करणे अधिनियम २०१३ कलम ३(१), (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक संतोष भंडारे यांनी तात्काळ हवालदार बाबासाहेब पाटोळे, पोलीस नाईक विनोद गभिंरे, ढोकणे, पथवे व वाघ यांना योग्य त्या सुचना देऊन आरोपीचा शोध घेण्यासाठी पाठवले होते. यावेळी मोठ्या शिताफीने या पोलीस पथकाने शिरापूर येथे मध्यरात्री ३ वाजता सापळा लावून आरोपीच्या मुसक्या आवळत त्याला अटक केली आहे.
दरम्यान मंगळवारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने ४ ऑगस्ट पर्यत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली असून या गुन्ह्याचा तपास स्वतः पोलीस निरीक्षक संतोष भंडारे करत आहेत.