संग्रहित छायाचित्र
◻️ दाढ खुर्द येथे आठ ते दहा दिवसांपासून तळ ठोकून असलेल्या वनविभागाला अखेर यश
◻️ बिबट्याची मादी व दोन पिल्ले संगमनेरला हालवल्याने नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास
संगमनेर LlVE | संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द शिवारात मागील दोन महिन्यांपासून धूमाकूळ घालणारी व १० ते १२ लोकांवर हल्ले करुन जखमी करणारी बिबट्याची मादी व तिचे दोन पिल्ले जेरबंद करण्यात वनविभागाला बुधवारी पहाटे यश आले आहे.
दाढ खुर्द शिवारात मागील दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात बिबट्याची दहशत आहे. दाढ खुर्द- शिबलापूर रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या १० ते १२ नागरीकानवर हल्ला करत जखमी केले होते. त्यामुळे परिसरात मोठी दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे आक्रमक झालेल्या ग्रामस्थाच्या मागणीनंतर परिसरातील विविध ठिकाणी पाच पिंजरे लावण्यात आले होते. तर हा बिबट्या जेरबंद करण्यासाठी मागील आठ दिवसांपासून वन अधिकारी संदीप पाटील, वनक्षेत्रपाल सुभाष सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे संतोष पारधी, सुहास उपासनी, रविंद्र पडोळे, हरिश्चंद्र जोजार आदि कर्मचारी घटनास्थळी तळ ठोकून होते.
यावेळी सीसीटीव्हीच्या माध्यमातून पिजंऱ्यावर लक्ष ठेवण्याचे काम वनविभागाकडून सुरु होते. रभाजी चिमाजी जोशी यांच्या गट नं ७५ मध्ये बुधवारी पहाटे मादी बिबट्या व तिची दोन पिल्ले ही पिंजऱ्यात जेरबंद झाली होती. त्यामुळे मादी बिबट्या व तिच्या पिल्लांना तात्काळ संगमनेर येथिल रोपवाटिकेत हालवण्यात आले आहे.
दरम्यान जेरबंद झालेली दोन्ही पिल्ले दोन ते तीन महिन्यांची असल्याची माहिती वनविभागाने दिली असून सरपंच सतिश जोशी, सुनिल जोशी, सुरेश जोरी, ग्रामपंचायत सदस्य चेतन पर्वत, रावसाहेब जमधडे, किशोर जोशी, बाबासाहेब वाडगे, रमेश जोशी, नारायण शिंगोरे, भागवत जोरी, पापामियॉ शेख, ग्रामपंचायत कर्मचारी संतोष बिरे, तुकाराम पर्वत आदिनी वनविभागाचे आभार मानले आहे. तर दाढ सह पंचक्रोशीतील नागरिकांनी यामुळे सुटकेचा निःश्वास सोडल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.