विकृत भिडेला बेड्या घालून जेलमध्ये टाका

संगमनेर Live
0
◻️ भडकलेल्या बाळासाहेब थोरात यांची सभागृहात मागणी


◻️महापुरुषांच्या बदनामीचा जो कार्यक्रम सुरू आहे तो सरकारच्या आशीर्वादाने सुरू आहे का?

संगमनेर LlVE (मुंबई) | ‘संभाजी भिडे नामक विकृत इसमाने महात्मा गांधी, सावित्रीबाई फुले आणि महापुरुषांचा ज्या भाषेत अपमान केला आहे, ती भाषा सुद्धा सभागृहात मांडणे शक्य नाही. भिडे वारंवार असे बोलतोय आणि सरकार काहीही करायला तयार नाही. याउलट पोलिसांच्या दिमतीत तो फिरतो आहे, याचा अर्थ महापुरुषांच्या बदनामीचा जो कार्यक्रम सुरू आहे तो सरकारच्या आशीर्वादाने सुरू आहे का? अशी शंका येऊन जाते, सरकारने भिडे आणि त्याच्या सारख्या इतर विकृतांना बेड्या घालून जेलमध्ये टाकावे अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी सभागृहात केली.

विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर बोलताना थोरात यांनी कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत सरकारवर सडकून टीका केली.

थोरात म्हणाले, ‘राज्यात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत, महिला व मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. तीन महिन्यात पाच हजार सहाशे मुली बेपत्ता झाल्या आहेत. हुंडाबळी आणि महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये देखील वाढ झालेली आहे. महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्याला हे शोभणारे नाही. राज्यातील शहरे हे गुन्हेगारीचे अड्डे बनत चालले आहे. नगर शहरात वाढलेल्या गुन्हेगारीचा प्रश्न मी सभागृहात यापूर्वी उपस्थित केलेला होता. शहरांमधील नागरिकांमध्ये भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झालेले आहे.’

थोरात म्हणाले, ‘राज्यातील निवडणुका जवळ आल्याने काही मंडळींकडून राज्यातील वातावरण खराब करण्याचे प्रयत्न जाणीवपूर्वक सुरू आहेत. जात आणि धर्माच्या नावावर समाजामध्ये, माणसांमध्ये भेद निर्माण केला जातो आहे. काही लोक प्रक्षोभक भाषणे करून अशांतता निर्माण करत आहे. अशी प्रक्षोभक भाषणे करणाऱ्यांच्या टोळ्या राज्यात सक्रिय झालेल्या आहेत. आपल्याला महाराष्ट्राला नेमके कुठे घेऊन जायचे आहे? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आपण मणिपूर हरियाणाच्या मार्गे महाराष्ट्र घेऊन जाणार आहोत का? असा संतप्त सवाल थोरात यांनी उपस्थित केला.

महापुरुषांच्या बदनामी वर बोलताना थोरात म्हणाले, ‘इंडिया पोस्ट, इंडिकेटल्स, भारद्वाज स्पिक ही माणसं कोण आहे? त्यांच्या पाठीमागचा मास्टरमाईंड कोण आहे? हे सरकारने शोधलं पाहिजे. सावित्रीबाई फुले यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन लिखाण करण्याची यांची हिम्मतच होते कशी? त्यांच्यावर जर कारवाई होत नसेल तर महाराष्ट्रातल्या जन माणसांमध्ये ही भावना निर्माण होईल की सरकारच्या आशीर्वादाने सर्व सुरू आहे. भिडे सारखा विकृत माणूस वारंवार महात्मा गांधी, महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अपमान करतोय. आणि त्यावर या सभागृहात बोलू सुद्धा दिले जात नाही. खरंतर अशा विकृत प्रवृत्तीच्या माणसांना बेड्या घालून जेलमध्ये टाकले पाहिजे. सरकारने या प्रश्नांची उत्तर द्यावीत.’

मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि भुजबळ सत्तेत गेले आणि शांत झाले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या विचारांचा वारसा सांगतात तो विचार प्रबोधनकारांचा आहे. आज प्रबोधनकार असते तर काठी घेऊन बाहेर पडले असते आणि त्यांनी भिडेसारख्या वृत्तीला सोलपटून काढले असते. अजितदादा, भुजबळ साहेब आपण सारे पुरोगामी विचारांचे आहोत. तुम्ही सगळी माणसं सत्तेत गेला आणि शांत झालात, असा चिमटाही बाळासाहेब थोरात यांनी सत्ताधाऱ्यांना काढला.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !