◻️शासन आपल्या दारी या उपक्रमानिमित्त प्रवरा परिसर, राहाता, संगमनेर आणि श्रीरामपूर या तालुक्यातील गावांचा आढावा
◻️जादा पैसे घेणाऱ्या सेतू केंद्र चालकांवर कारवाई करण्याच्या मंत्री विखे पाटील यांच्या सुचना
◻️कैलासराव तांबे, सतिष ससाणे, डॉ. भास्करराव खर्डे पाटील, मच्छिंद्र थेटे यांचा ना. विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार
संगमनेर LIVE (लोणी) | शासन आपल्या दारी या उपक्रमातून नागरीकांच्या समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न होत आहे. गावपातळीवर कार्यकर्त्यांनी सुध्दा शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा जागृतपणे घेतला पाहीजे. सर्व विभागाच्या आधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सामान्य नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी समन्वय कायम ठेवून काम करावे असे आवाहन महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या निमित्ताने मंत्री विखे पाटील यांनी प्रवरा परिसर, राहाता, संगमनेर आणि श्रीरामपूर या तालुक्यातील गावांचा आढावा घेतला. पदाधिकारी आणि ग्रामस्थांसह कार्यकर्ते याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, डॉ. विखे पाटील कारखान्याचे चेअरमन कैलासराव तांबे, व्हा. चेअरमन सतिष ससाणे, प्रवरा बॅकेचे चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे, व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे, प्रांताधिकारी माणीकराव आहेर, शैलेश हिंगे, तहसीलदार अमोल मोरे, धिरज मांजरे, उपविभागीय कृषि आधिकारी विलास गायकवाड, सहाय्यक निबंधक रावसाहेब खेडकर, तालुका कृषि आधिकारी आबासाहेब भोरे, गटविकास आधिकारी नागणे यांच्यासह सर्व विभागांचे आधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल कैलासराव तांबे व व्हाईस चेअरमन सतिष ससाणे, प्रवरा बॅकेचे चेअरमन डॉ. भास्करराव खर्डे पाटील, व्हा. चेअरमन मच्छिंद्र थेटे यांचा ना. विखे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रामुख्याने गावपातळीवर शेतकऱ्यांच्या केवायसी होत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आल्या आहेत. याबाबत योग्यती दखल घ्यावी. शेतकऱ्यांकडून जाणीवपुर्वक जादा पैसे घेणाऱ्या सेतू केंद्र चालकांवर कारवाई करण्याच्या सुचना देवून मंत्री विखे पाटील म्हणाले की, कृषि योजनांच्या बाबती कृषि सहाय्यकांनी शेतकऱ्यांमध्ये योजनांबाबतचे मार्गदर्शन करावे. महसूल विभागाच्या अडचणींबाबतही त्यांनी गांभिर्याने कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या. यासाठी तलाठी कार्यालयातून हलगर्जीपणा होत असल्याची बाब यापुढे सहन केली जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
जलजीवन मिशन योजनेच्या बाबतीत त्रृटी दूर करण्याच्या सुचना आपण मागील बैठकीतच दिलेल्या होत्या. पुढील महिन्यात पुन्हा आपण या संपूर्ण योजनेचा आढावा घेणार असून या योजनेतील कुठलाही अनागोंदी कारभार समोर आला तर ठेकेदारासह आधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. या योजनेला कुठेही गालबोठ लागता कामा नये असेही त्यांनी सांगितले.
शासन आपल्या दारी हा निरंतर चालणारा उपक्रम आहे. त्यामुळे आधिकाऱ्यांनी यामध्ये सातत्य राखून योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घ्यावा. भविष्यात आणखी लाभार्थी कसे योजनामध्ये प्राप्त ठरतील याबाबतही प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी आधिकाऱ्यांना केले.