संगमनेर LIVE | सहकारासाठी मापदंड ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने स्वच्छ व गुणवत्तेच्या पेट्रोल बरोबर नव्याने गरजेचा असलेल्या पर्यावरण पूरक सीएनजी पंप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत कार्यान्वित केला आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळ येथे सीएनजी पंपचा शुभारंभ झाला. यावेळी विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे आदींसह विविध मान्यवर, विभाग प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, थोरात कारखान्याने कायम काळानुरूप बदल केले आहे. पेट्रोल व डिझेल साठी सीएनजी हा मोठा पर्याय आहे. इथेनॉल निर्मितीतून पेट्रोलला सक्षम पर्याय तयार होत आहे. वाढलेली वाहने आणि त्यामुळे होणारे पर्यावरणाचे नुकसान याकरता सीएनजी चा वापर गरजेचा ठरणार आहे.
थोरात सहकारी साखर कारखान्याने कायम आदर्शवत काम केले असून अत्याधुनिक प्रणालींचा वापर केला आहे. ऊस उत्पादक, सभासद, शेतकरी, कामगार या सर्वांचा या कारखान्यावर मोठा विश्वास असून उपपदार्थ निर्मितीवरही कारखान्याने भर दिला असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी बाबा ओहोळ यांनी मनोगत व्यक्त केले असून या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सेक्रेटरी किरण कानवडे यांनी सूत्रसंचालन केले तर एकनाथ काळे यांनी आभार मानले. याप्रसंगी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पहिल्या गाडीला सीएनजी भरून देऊन हा पेट्रोल पंप कार्यान्वित करण्यात आला.