◻️ पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धा
◻️ १ हजार ७८० विद्यार्थिनींनी नोदंवला स्पर्धेत सहभाग
संगमनेर LIVE (लोणी) | प्रत्येकाच्या जीवनात कलेला अनन्यसाधारण महत्व असून कलेमुळे जीवन समृद्ध बनते. प्रत्येक विद्यार्थिनींनी चौदा विद्या आणि चौसष्ट कलांपैकी कोणतीही कला जोपासली पाहिजे. कलेचा छंद जीवन विकासासाठी खुप आवश्यक असून, कलेशिवाय जीवन निरर्थक आहे. कलेतून मिळणारा आनंद अमूल्य आहे, कलेमुळे मानसिक, भावनिक आरोग्य सुधारते व जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक बनतो असे प्रतिपादन लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे यांनी केले.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे जयंतीनिमित्त प्रवरा कला अध्यापक संघ आयोजित भव्य ललित कला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सौ. सरोदे बोलत होत्या. कार्यक्रम प्रसंगी प्राचार्या सौ. भारती कुमकर, मुख्याध्यापिका सौ. सीमा बढे, कलाशिक्षक जितेंद्र बोरा, चंद्रशेखर शिंदे, जेष्ठ शिक्षक लबडे अनिल लोखंडे, सुरेश गोडगे, जेष्ठ शिक्षिका सौ. मोहिनी गायके, सौ. विद्या गाढे, सौ. शितल आहेर, रवींद्र डगळे, योगेश दिघे, सुरज फणसे, नितीन शिरसाठ आदी उपस्थित होते.
यावेळी सौ. सरोदे म्हणाल्या की, भारतीय संस्कृती विविध कलांनी समृद्ध व सुंदर बनली आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पद्यश्रीच्या विचार आणि कार्याचीही ओळख त्यांनी करुन दिली. प्रवरा कन्या विद्यामंदिर प्राथमिक आणि माध्यमिक मिळून १ हजार ७८० विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेतला.