◻️ तब्बल ८० कोटी ७९ लाख ४१ हजार ९८१ रुपयांचा घोटाळा
संगमनेर LIVE | संगमनेर शहरातील नावाजलेल्या आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळख असणाऱ्या दूधगंगा पतसंस्थेमध्ये तब्बल ८० कोटी ७९ लाख ४१ हजार ९८१ रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी संस्थेचे अध्यक्ष व माजी जिल्हापरिषद सदस्य भाऊसाहेब कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांच्यासह एकूण २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील चार जणांना अटक करण्यात आली आहे. जर तालुक्यातील नावाजलेल्या पतसंस्थेत जर असा घोटाळा होत असेल तर इतर पतसंस्थांवर विश्वास ठेवायचा की नाही? असा प्रश्न संगमनेरकरांना पडला आहे.
गेल्या दीड वर्षांपासून दूधगंगा पतसंस्थेतील आर्थिक अपहाराचे प्रकरण चांगलेच पुढे आले. या पतसंस्थेचे २०१६ ते २०२१ या पाच वर्षांचे फेर लेखा परीक्षण करण्यात आले या लेखापरीक्षणांमध्ये आर्थिक अपहार झाल्याचे उघड झाले. यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी विशेष लेखा परीक्षकांना गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली. गुन्हा दाखल होण्यास विलंब होत असल्याने ठेवीदारांनी संताप व्यक्त केला होता. जिल्हा विशेष लेखापरीक्षक राजेंद्र निकम यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अखेर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
दूधगंगा पतसंस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक यांच्यासह नातेवाईकांनी ८० कोटी ७९ लाख ४१ हजार ९८१ रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब कुटे (रा. गणपती मळा सुकेवाडी), भाऊसाहेब गुंजाळ (रा. संगमनेर), भाऊसाहेब गायकवाड (मयत) (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर), चेतन कपाटे (रा. पैठणरोड, संभाजीनगर, औरंगाबाद), दादासाहेब कुटे (रा. गणपतीमळा, ता. संगमनेर), अमोल कुटे (रा. गणपतीमळा, ता. संगमनेर), विमल कुटे (रा. गणपतीमळा, ता. संगमनेर), शकुंतला कुटे (रा. गणपतीमळा, ता. संगमनेर), सोनाली कुटे (रा. गणपतीमळा, ता. संगमनेर), कृष्णराव कदम (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), प्रमिला कदम (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), अजित कदम (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी), संदिप जरे (रा. भूतकरवाडी सावेडी, ता. नगर), लहानु कुटे (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर), उत्तम लांडगे (रा. वडगाव लांडगा, ता. संगमनेर), उल्हास थोरात रा. सुकेवाडी, ता. संगमनेर), सोमनाथ सातपुते (रा. पावबाकी, ता. संगमनेर), अरुण बुरड (रा. नयनतारा सिडको कॉलनी, नाशिक), अमोल क्षीरसागर (रा. गंगापूर रोड, नाशिक) यांच्यावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपहर प्रकरणी जिल्हा विशेष लेखापरीक्षक राजेंद्र फकिरा निकम यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार शहर पोलिसांनी वरील २१ व्यक्तींविरुद्ध ७४०/२०२३ भारतीय दंड संहिता ४२०, ४०८, ४०९, ४६५, ४६७, ४७१, ४७७ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणात लहानु कुटे, उल्हास थोरात, सोमनाथ सातपुते, अमोल क्षीरसागर यांना पोलिसांनी अटक केली आहे. इतर आरोपीचा शोध सुरु आहे.
दरम्यान दूधगंगा पतसंस्थेतील अपहार प्रकरणी मोठ्या प्रतीक्षेनंतर गुन्हा दाखल झाल्याने ठेवीदार व सभासदांनी समाधान व्यक्त केले असून शहरासह तालुक्यातील बाकीच्याही पतसंस्थांचे व्यवहार तपासण्याची गरज असल्याचे सामान्य नागरिक म्हणने आहे. या प्रकारामुळे संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.