◻️ राष्ट्रीय पुरस्कारामळे काम करण्यास अधिक ऊर्जा - डॉ. जयश्री थोरात
◻️ प्रतिष्ठेचा पुरस्कार संगमनेर तालुक्यातील ज्येष्ठ महिलांनी स्वीकारला
संगमनेर LIVE | महिला सबलीकरण व ग्रामीण महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती तसेच कोरोना संकटात कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रात्रंदिवस काम करणाऱ्या कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई बाळासाहेब थोरात यांच्या कार्याचा दिल्ली सरकारने राष्ट्रीय एकता पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्यूशन क्लब हॉलमध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमात ओबीसी आयोगाचे अध्यक्ष जगदीश यादव, पंडित बल देवराज वर्मा, जीएसटीचे कमिशनर सारांश महाजन, धरमपाल भारद्वाज, जसबीर सिंग करारा ,अनुप चावला यांच्या उपस्थितीमध्ये डॉ. जयश्रीताई बाळासाहेब थोरात यांचा राष्ट्रीय एकता पुरस्कार संगमनेर तालुक्यातील सोनोशी येथील जेष्ठ महिला सौ. केशरबाई कचरू सानप व साकुर येथील सौ. रेऊबाई नान्नर यांनी स्वीकारला.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७६ व्या दिनानिमित्त देशातील १६ राज्यांमधील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना आयोगाचे अध्यक्ष जगदीश यादव म्हणाले की, देश भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहे. विविध क्षेत्रात देशांने मोठी प्रगती केली आहे. अजूनही देशामध्ये अनेक गोरगरीब विकासापासून वंचित आहे. या पुरस्कार विजेत्यांनी हे वंचित प्रवाहात आणण्यासाठी काम करावे.
महाराष्ट्रात सहकारातून प्रगती साधली असून सहकार क्षेत्रात थोरात परिवाराचे नाव मोठे आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ जयश्रीताई थोरात यांनी टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या माध्यमातून दुर्दम्य अशा ब्लड कॅन्सर विभागात काम करताना अनेकांना जीवदान दिले आहे. ग्रामीण व आदिवासी महिलांमध्ये आरोग्याबाबत जनजागृतीचे त्यांचे कार्य नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहे. अहमदनगर जिल्हा हा सहकाराचा जिल्हा म्हणून ओळखला जात असून शिर्डी व शनिशिंगणापूर हे प्रसिद्ध देवस्थान एकतेचा संदेश देत असल्याचेही ते म्हणाले.
अनुप चावला म्हणाले की, एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून ग्रामीण भागात महिला आरोग्यासाठीची मोठी चळवळ उभारून डॉ. जयश्रीताई थोरात यांनी आदर्श निर्माण केला आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर सौ केशरबाई सानप म्हणाल्या की, आमदार बाळासाहेब थोरात यांचा संस्कार घेऊन डॉ. जयश्रीताई काम करत आहे. आमदार थोरात व डॉ. जयश्रीताई थोरात यांचा दिल्लीत होणारा गौरव हा संगमनेर तालुका व महाराष्ट्राची छाती अभिमानाने फुलवणारा आहे. तर रेवुबाई नान्नर म्हणाल्या की, माझ्यासारख्या ग्रामीण महिलेला दिल्लीत मानाचा पुरस्कार घेण्याची ही मोठी संधी आ. थोरात यांच्यामुळे मिळाली आहे.
राष्ट्रीय पुरस्कारामळे काम करण्यास अधिक ऊर्जा - डॉ जयश्री थोरात
लोकांची सेवा करत राहणे हा थोरात परिवाराने दिलेला संस्कार आहे .त्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य व महिला सबलीकरणाचे , व युवकांसाठी काम आपण करत आहोत. या पुरस्काराने नक्कीच काम करण्यास अधिक ऊर्जा मिळेल असे कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी म्हटले आहे.