◻️ सोलापूर शासकीय विश्रामगृह येथिल घटना ; आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक
संगमनेर LIVE | आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा समाज आक्रमक झाला असून त्यापाठोपाठ आता धनगर समाजानेही आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. धनगर समाजाला आरक्षण द्या, या मागणीसाठी आज (शुक्रवार) धनगर आरक्षण कृती समिती आक्रमक भूमिका घेत भाजपचे जेष्ठ नेते व सोलापुरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळला असलेल्याचे प्रसारमाध्यमांनी दिले आहे.
सोलापूर शासकीय विश्रामगृहात हा प्रकार घडला. या प्रकरणी धनगर आरक्षण कृती समितीच्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ना. राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर दौऱ्यावर आहेत.
आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ते शासकीय विश्रामगृहात थांबले होते. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी धनगर आरक्षण कृती समितीचे काही सदस्य त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांनी ना. विखे पाटील यांना निवेदन दिले.
शंकर बंगाळे यांनी अचानक ना. विखे पाटील यांच्या डोक्यावर भंडारा उधळला. विखें पाटलांच्या सुरक्षारक्षकांनी बंगाळेंना चोप दिला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. धनगर आरक्षणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे, सरकार आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप धनगर आरक्षण कृती समितीने यावेळी केला असल्याचे प्रसारमाध्यमांमध्ये सांगितले जात आहे.