◻️ जिल्हा बॅकेच्या कर्जावरून मंत्री विखे पाटील यांच्यावर केलेले आरोप कपोकल्पित आणि व्यक्तिद्वेशातून
संगमनेर LIVE (राहाता) | गणेश कारखान्याच्या संचालक मंडळाने जिल्हा बॅकेच्या कर्जावरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केलेले आरोप कपोकल्पित आणि व्यक्तिद्वेशी भावनेतून असून, कारखाना चालविण्यात येत असलेल्या अपयशाचे खापर दुसऱ्याच्या माथी फोडण्याचा प्रकार आहे. विखे पाटील यांच्यावर टिका करण्यात शक्ती वाया घालविण्यापेक्षा संगमनेर आणि संजीवनीने भांडवल गुंतवून कारखाना चालवून दाखवावा, गणेश कारखान्यावर पुन्हा कर्जाचा बोजा चढवू नका असे आवाहन गणेश करखान्याचे माजी चेअरमन मुकूंदराव सदाफळ यांनी केले आहे.
यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात मुकूंदराव सदाफळ यांनी म्हणले आहे की, गणेश कारखाना निवडणुकीत दोन जबाबदार नेत्यांनी कारखाना यशस्वीपणे चालविण्याचा शब्द निवडणूकीत सभासदांना दिला आहे. आता त्यांनीच भांडवलाची गुंवणूक करणे गरजेचे आहे. डॉ. विखे पाटील सहकारी कारखान्याने कारखाना चालविण्यास घेताना स्वत:च्या हिंमतीवर भांडवलाची उभारणी करून सभासद, कामगारांचे हित जोपासले होते. संगमनेर आणि संजीवनी कारखान्याने सुध्दा भांडवलाची उभारणी करुन गणेश कारखाना चालवावा. आता कर्जमुक्त झालेल्या गणेश कारखान्यावर पुन्हा कर्जाचा बोजा चढवू नये आशी मागणी सदाफळ यांनी केली.
कारखाना निवडणुकीत सभासदांची दिशाभूल करून तुम्ही विजय मिळवला आहे. सभासदांचा कौल मान्य करून मंत्री विखे पाटील यांनी मनाचा मोठेपणा दाखवून डॉ.विखे पाटील कारखान्याच्या कराराची कोणतीही अडचण गणेश कारखाना चालवितांना येणार नाही असा शब्द केवळ शेतकरी सभासदांच्या हितासाठी दिला. परंतू आज तुम्हाला कारखाना चालविताना येत असलेल्या अडचणीचे खापर विखे पाटील यांच्यावर फोडण्याचा सुरू झालेला प्रयत्न म्हणजे जबाबदारी झटकण्याचा प्रकार असल्याची टिका त्यांनी पत्रकात केली.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कारखाना चालविताना ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांची सर्व देणी दिलीच परंतू यापेक्षाही महत्वाचे म्हणजे गणेश कारखाना कर्जमुक्त करून दाखवला आहे. आता त्याच गणेश कारखान्यावर पुन्हा कर्जाचा बोजा चढवू नका अशी मागणी करुन, सदाफळ म्हणाले की, कारखाना चालविण्यास घेताना डॉ. विखे पाटील कारखान्याने आर्थिक भार सोसला आहे. गणेश कारखान्यावर कोणताही आर्थिक बोजा येवू दिला नाही याचा विसर पडू देवू नका असेही त्यांनी सुचित केले.
डॉ. विखे पाटील कारखान्याची देणी देण्याबाबत कोणतीही चर्चा करायला गणेश कारखान्याचे संचालक तयार नाहीत, परंतू कर्ज किंवा भांडवल उभारता येत नाही म्हणून लगेच विखे पाटील यांना जबाबदार धरणे म्हणजे गणेशच्या संचालकांनी आपली हतबलता स्पष्ट करून दाखवण्या सारखे असल्याचे नमूद करून विखे पाटलांवर टिका करण्यात शक्ति वाया घालविण्यापेक्षा कारखाना चालविण्याचे दायित्व संगमनेर आणि कोपरगावच्या नेत्यांनी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.