◻️ हिंदू धर्माबद्दल उदयननिधी स्टॅलीन यांच्या वक्तव्याचा विखे पाटील यांच्याकडून निषेध
◻️ उध्दव ठाकरे सत्तेच्या हव्यासापोटी हिंदू धर्माबद्दल विधानं करणाऱ्या मच्छरांना आपल्या भोवती गोळा करणार का?
संगमनेर LIVE (नगर) | सनातन धर्माबद्दल उदयननिधी स्टॅलीन यांनी केलेले बेताल वक्तव्य म्हणजे त्यांना मेंदूज्वर झाल्याचे लक्षण असून, जिहादी प्रवृत्तीच्या या वक्तव्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आता त्यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्रातील इंडिया आघाडीच्या नेत्यांनी खुलासा करण्याची गरज असल्याचे मत महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
हिंदू धर्माबद्दल उदयननिधी स्टॅलीन यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करुन, मंत्री विखे पाटील म्हणाले की, हिंदू धर्माला हजारो वर्षांची परंपरा आहे. भगवतगीते पासून ते ज्ञानेश्वरी पर्यंतचा वैचारिक वारसा या भूमीत दृढ झाला आहे. त्याला नष्ट करण्याची किंवा इजा पोहोचविण्याची ताकद असल्या उपद्रवी मच्छरांमध्ये नाही.
आता या उदयनिधींचे वडील ज्या इंडिया आघाडीमध्ये सहभागी झाले आहेत. त्याच आघाडीचे नेतृत्व उध्दव ठाकरे करायला निघाले आहेत. आता स्टॅलीन यांचे वक्तव्यत्यांना मान्य आहे, का याचाही खुलासा करण्याची गरज आहे. कारण उध्दव ठाकरे यांना हिंदूत्वाचे प्रेम सोईनूसार उफाळून येत आहे. उटसुट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगून तुमचे हिंदूत्व सिध्द होणार नाही. त्यामुळे उध्दवजी आता सत्तेच्या हव्यासापोटी हिंदू धर्माबद्दल अशी विधानं करणाऱ्या मच्छरांना आपल्या भोवती गोळा करणार का असा सवालही मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.