◻️ “प्रतिकूल परिस्थितीवर मात” या श्रेणीत निवड झालेली स्नेहालय शाळा ही एकमेव भारतीय शाळा
◻️ वंचितापर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याचा शाळेचा संकल्प
संगमनेर LIVE (अहमदनगर) | जगातील सर्वोत्कृष्ट पहिल्या तीन शाळात स्नेहालयचा समावेश काल घोषित करण्यात आला. प्रतिकूलतेवर यशस्वी मात करीत वंचितापर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचवण्याच्या स्नेहालयच्या मागील दीड दशकांच्या प्रयत्नांना काल वैश्विक दाद मिळाली आहे. प्रतिकूलतेवर मात’ या श्रेणीमध्ये ही निवड झाल्याचे इंग्लंड मधील T4 Education, यांनी काल घोषित केले.
स्नेहालयने यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त ‘जल्लोष नगरकरांचा ‘ हे शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक संमेलन आयोजिले होते. आय लव नगर उपक्रमाचे संस्थापक नरेंद्र फिरोदिया यांनी या संमेलनात टी ४ या इंग्लंडमधील संस्थेकडून आलेल्या ई-मेलचा चा संदर्भ देत ही घोषणा केली अन् उपस्थित विद्यार्थ्यांनी प्रचंड जल्लोष केला.
यावेळी संवादक म्हणून साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त बाल साहित्यिक डॉ. संगीता बर्वे, सिएटल (अमेरिका) येथील संगणकतज्ञ आनंद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
फिरोदिया यांनी नमूद केले की, आज स्नेहालय शाळेचा समावेश पहिल्या तीन शाळांमध्ये झाला असला तरी लवकरच जगातील सर्वोत्कृष्ट प्रथम क्रमांकाच्या शाळेचा सन्मान ती प्राप्त करेल. इंग्लंड आणि जेरुसलेम येथील अन्य दोन शाळा स्नेहालय सोबत स्पर्धेत आहेत. स्नेहालय शाळेत आय लव नगरतर्फे बुद्धिबळ प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची तसेच अन्य दोन खेळांचे पूर्णवेळ प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची घोषणा यावेळी फिरोदिया यांनी केली.
डॉ. बर्वे यांनी नगर जिल्ह्यातील बेलापूर गावातील त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगितल्या तसेच मुलांना त्यांच्या कविता आणि कथा ऐकवून मंत्रमुग्ध केले.
स्नेहालय शाळेच्या वर्धापन दिनानिमित्त स्नेहालयने अहमदनगर मधील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. विजेत्या शाळांना रोख पारितोषिके आणि सन्मानचिन्ह देण्यात आली. शाळांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
फिरोदिया म्हणाले की, “ही निवड आणि त्यामुळे होणारा गौरव हा केवळ एका भव्य आणि उदात्त कल्पनेचा नाही. तर मूलतः तो अशी कल्पना प्रत्यक्षात आणण्याची स्नेहालय टीमची कल्पकता, चिकाटी, दृष्टी आणि सांघिक कार्य यांचा आहे”
भेदभावाचे सर्व अडथळे दूर करण्यासाठी आम्हाला या निवडीने बळ मिळाली, असे संस्थेचे सचिव राजीव गुजर म्हणाले.
अद्वितीय शाळा..
प्रतिकूल परिस्थितीवर मात, या श्रेणीत निवड झालेली स्नेहालय शाळा ही एकमेव भारतीय शाळा असल्याचे शाळेचे मानद संचालक राजेंद्र शुक्रे म्हणाले.
विद्यालयाच्या प्राचार्य क्षितिजा हडप यांनी सांगितले की , इस्रायलमधील जेरुसलेम येथील ‘मॅक्स रेन हँड इन हँड स्कूल’ ही या देशातील एकमेव द्विभाषिक, एकात्मिक ज्यू-अरब प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहे. तर दुसरी शाळा इंग्लंड मधील वेल्स भागातील ‘कॅडॉक्सटन प्रायमरी स्कूल’ आहे. उपासमार आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी या शाळेने ‘अन्न खरेदी साठी जमेल ती किंमत अदा करा’ या तत्वावर खाद्य दुकाने सुरू केली.
स्नेहालयचे संचालक हनीफ शेख यांनी हा संदर्भ देत नमूद केले की, प्रतिकूल परिस्थितीशी झगडणाऱ्या मुलांसमोर गुंतागुंतीचे सामाजिक-भावनिक प्रश्न असतात. त्यासाठी त्यांना या स्थितीला योग्य प्रतिसाद देण्याचे आणि अनुरूप कौशल्यांचे शिक्षण स्नेहालयने दिले. विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्त्व विकास तसेच शाळेची एक समुदाय म्हणून ओळख विकसित केली.
एचआयव्ही/एड्सग्रस्त मुलांचे, वेश्या व्यवसायातील बळी महिलांच्या मुलांचे, अन्य सामाजिक कुप्रथांचे बळी ठरलेल्या हक्कवंचित बालकांचे जीवन बदलण्यासाठी केलेल्या सजग प्रयत्नांमुळे स्नेहालय शाळा टी ४ परीक्षणात निवडली गेली. शिक्षकांच्या योगदानाचा त्यानी उल्लेख केला.
स्नेहालयचे अध्यक्ष संजय गुगळे म्हणाले की, सध्या स्नेहालय शाळेतील ७० टक्के विद्यार्थी हे संस्थेच्या बाहेरील कुटुंबांमधून येत आहेत.मागील ३ वर्ष इयत्ता १० वी चा निकाल १०० टक्के लागला. शाळेचा असामान्य दर्जा आणि विविधांगी उपक्रम आता सर्व स्तरातील विद्यार्थी आणि पालकांना आकर्षित करीत असल्याचे म्हणाले आहेत.