चिचंपूर, दाढ खुर्द, खळी, पानोडी, उंबरी बाळापूर आदि गावात कडकडीत बंद
◻️ मराठा आरक्षण मागणीसाठी आश्वी पंचक्रोशीतील मराठा समाज बांधव आक्रमक
संगमनेर LlVE | मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगें पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण मागणीसाठी उपोषण सुरू केले असून पाच दिवस उलटूनही राज्य सरकारने यावर कोणताही निर्णय न घेतल्यामुळे संगमनेर तालुक्यातील सकल मराठा बांधव आक्रमक झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील चिचंपूर, दाढ खुर्द, खळी, पानोडी, ओझर व उंबरी बाळापूर गावात मराठा आरक्षणाला पाठींबा देण्यासाठी कडकडीत बंद पाळण्यात आला असून यामध्ये परिसरातील अनेक गावे व वाड्या वस्त्या देखील सहभागी झाल्या होत्या.
तालुक्यातील वरंवडी येथे राजकीय नेत्यांना गावात येण्यास मज्जाव करण्यात आला असून तसा फ्लेक्सचं गावाच्या मुख्य दर्शनी भागात लावण्यात आला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून गाव - खेड्यात या आदोंलनाची आक्रमकता वाढल्याचे दिसत आहे. याचांच एक भाग म्हणून चिचंपूर, दाढ खुर्द, खळी, पानोडी, ओझर, खरशिदें, प्रतापपूर व उंबरी बाळापूर येथिल व्यापारी व नागरीकानी सोमवारी स्वसंस्फूर्तीने बंद पाळून मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला व मनोज जरांगें पाटील यांच्या उपोषणाची सरकारने तातडीने दखल घेऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली आहे.
दरम्यान लोणी - संगमनेर महामार्गावरील निमगावजाळी येथे उद्या बंद व साखळी उपोषणाला सुरुवात होणार आहे. तर सोमवारी यावेळी बंद पाळण्यात आलेल्या गावांमध्ये मनोज जरांगें पाटील यांच्या नावाचा जयघोष करत ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणाबाजी करण्यात आली आहे. बंद सगळीकडे शांततेत पार पडला आहे.