◻️ शांततेने चाललेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला तोडफोडीच्या प्रकाराने गालबोट लावण्याचा प्रयत्न करु नका
संगमनेर LlVE (मुंबई) | मराठा समाजाच्या आरक्षणाला सुरुवातीपासुन रिपब्लिकन पक्षाने पाठीबा दिला आहे. मराठा समाजातील ज्यांचे उत्पन्न ८ लाखाच्या आत आहे अशा गरिबांना मराठा समाजाचे आरक्षण मिळणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणामुळे एसटी, एसएससी आणि ओबीसी यांच्या आरक्षणाला धोका निर्माण होणार नाही. मराठा समाजाला ओबीसीं प्रमाणेच स्वतंत्र प्रवर्ग शोधुन आरक्षण दिले पाहिजे. मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करणे चुकीचे असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी म्हटले आहे.
अँड. गुणरत्न सदावर्ते त्यांची मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करण्याची घेतलेली भुमिका हे त्यांचे व्यक्तिगत मत आहे. त्या मताशी रिपब्लिकन पक्ष आणि आंबेडकरी जनता आम्ही सहमत नाही. इतर कोणाच्याही आरक्षणाला कोणताही धक्का न लागता मराठा समाजातील गरीबांना आरक्षण देणार असेल तर आपण त्याचे स्वागत केले पाहिजे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एक मराठा लाख मराठा असे लाखोंचे अनेक मोर्चे महाराष्ट्रात निघाले. शांततापूर्वक निघाले. मराठा समाजातील आया-बहिणींनी, युवकांनी, तरुणांनी सर्वांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरुन शांततेने आंदोलन केले.
अँड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करुन मराठा समाजाच्या आरक्षणाच्या शांततेने चाललेले आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रकार केलेला आहे. हा प्रकार करणे चुकीचे आहे. त्यांना शिक्षा झाली पाहिजे. मराठा समाजाचे आरक्षणाचे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात शांततेने चालले ते योग्य आहे. आणि त्या आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे. असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी आज पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.