◻️ पहिल्या दिवशी ५ हजारपेक्षा जास्त विद्यार्थी - नागरिकांनी घेतला प्रदर्शनाचा लाभ
संगमनेर LIVE (अहमदनगर) | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५५ व्या जयंतीचे औचित्य साधून अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात महात्मा गांधी जीवनदर्शन चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. संकुलातील विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांचा या प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळत असून पहिल्या दिवशी सुमारे ५ हजारपेक्षाही जास्त जणांनी या प्रदर्शनाला भेट दिली.
या प्रदर्शनाचे आयोजन भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, अहमदनगर व त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आले आहे. हे प्रदर्शन त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल येथील कन्या सभागृहात सोमवार आणि मंगळवार (२ व ३ ऑक्टोबर) असे दोन दिवस सुरू राहणार आहे.
या प्रदर्शनात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा संपूर्ण जीवनप्रवास (मोहनदास ते महात्मा गांधी) छायाचित्रांच्या माध्यमातून दर्शवण्यात आलेला आहे. यामध्ये महात्मा गांधीं इंग्लंडमध्ये असतानाचे क्षण, भारतात परतल्यानंतर त्यांनी केलेला चंपारण सत्याग्रह, असहकार आंदोलन, मीठाचा सत्याग्रह, चले जाव चळवळ, स्वातंत्र्यप्राप्तीसह त्यांच्या जीवनाची अखेर या विविध प्रसंगांमधील दुर्मिळ छायाचित्रे व संक्षिप्त माहिती यांचा समावेश आहे.
महात्मा गांधी जीवनदर्शन चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन आज (मंगळवार, २ ऑक्टोबर) त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठाणचे संस्थापक साहेबराब घाडगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
यावेळी, नेवासाचे तहसीलदार संजय बिरादार, गट विकास अधिकारी सुरेश पाटेकर, गट शिक्षण अधिकारी शिवाजीराव कराड, अहमदनगरचे जिल्हा माहिती अधिकारी रविंद्र ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कोलते पाटील, प्राचार्य सोपानराव काळे, प्राचार्य सचिन कर्डीले, प्राचार्य जितेंद्र पाटील, प्रसिद्धी अधिकारी माधव जायभाये, माध्यम अधिकारी हर्षल आकुडे, सहायक प्रसिद्धी अधिकारी पी. कुमार यांच्यासह संकुलातील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात जयभवानी लोक परिवर्तन प्रतिष्ठान बीड या कलापथकातील कलाकारांच्या जनजागृतीपर पोवाडा गायनाने करण्यात आली. यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना साहेबराव घाडगे पाटील यांनी सर्वप्रथम प्रदर्शनाचे कौतुक केले. ते म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना शांतीचे दूत म्हणून जगभरात ओळखले जाते. त्याचप्रमाणे लालबहादूर शास्त्री यांना त्यांच्या देशावरील निष्ठेसाठी तसेच कणखरपणासाठी ओळखले जाते. या दोन्ही महापुरुषांच्या जीवनाचा पाया हा न्याय, निष्ठा, देशभक्ती आणि कष्ट जीवनप्रवास या मूल्यांवर आधारित होता. देशाच्या स्वातंत्र्यात त्यांचा वाटा हा अतुलनीय असा राहिलेला आहे.
नेवासाचे तहसीलदार संजय बिरादार, गट विकास अधिकारी सुरेश पाटेकर, जिल्हा माहिती अधिकारी रविंद्र ठाकूर आणि प्रसिद्धी अधिकारी माधव जायभाये आदी मान्यवरांनी महात्मा गांधींच्या विविध कार्यांचा व त्यांच्या तत्वांचा आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यानंतर, केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय अंतर्गत केंद्रीय संचार ब्यूरोने आयोजित चित्रकला आणि निबंध लेखन स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमधील प्राविण्यप्राप्त खेळाडूंचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित विद्यार्थांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. हे प्रदर्शन सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. तसेच यादरम्यान विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दरम्यान या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक गाडे यांनी केले. तर केंद्रीय संचार ब्युरोचे प्रसिद्धी अधिकारी माधव जायभाये यांनी सर्वांचे आभार मानले.