◻️ आदर्श आचारसंहिता लागू ; संगमनेर तालुक्यातील ‘त्या’ ७ ग्रामपंचायतीत मोर्चेबांधणीला वेग
◻️ ५ नोव्हेंबरला मतदान तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी व निकाल
संगमनेर LIVE | जिल्ह्यातील १९५ ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी प्रशासकीय पातळीवर तयारी पुर्ण झाली असून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर निवडणूका होणाऱ्या गावांमध्ये वातावरण तापण्यास सुरवात झाली असून गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या उमेदवाराच्या मोर्चेबांधणीला वेग आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
कोविड - १९ व इतर कारणांमुळे काही महिन्यांपासून जिल्ह्यातील १९५ ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सदस्यांचा कार्यकाळ संपलेला असल्यामुळे याठिकाणी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली होती. या गावांमध्ये निवडणूकीसाठी आवश्यक असणारी सर्व प्रक्रिया जिल्हा निवडणूक आयोगाने पुर्ण केली आहे. निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर संपूर्ण यंत्रणा कामाला लागल्याचे चित्र आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचा यामध्ये समावेश आहे.
मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी आवश्यक प्रभाग रचना, प्रभागनिहाय आरक्षण तसेच मतदार यादीची घोषणा यापुर्वीच झालेली आहे. यासह थेट सरपंच पदासाठी जनतेतून निवडणूक होणार असल्याने त्याठिकाणी या पदाचे आरक्षण काढण्यात आलेले आहे. त्यामुळे आज निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यामुळे संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे निवडणूका असलेल्या गावातील राजकीय वातावरण तापण्यास सुरवात झाली आहे.
निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे....
नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दाखल करता येतील.
नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर २०२३ रोजी होईल.
नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.
५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल.
मतमोजणी ६ नोव्हेंबर २०२३ रोजी होईल. अशी माहिती मिळाली आहे.
या ग्रामपंचायतीचा आहे समावेश..
संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, घारगाव, गुंजाळवाडी, बोरवनवाडी, ढोलेवाडी, पिंपळगाव कोंझिरा तसेच जिल्ह्यातील महत्त्वाच्या दाढ बुद्रुक, उक्कलगाव, पोहेगाव, उंदीरगाव, चितळी, वारी, पिप्री निर्मळ, दत्तनगर, नाऊर, वाकडी, फत्याबाद, सडे, देसवंडी, वाडेगव्हाण, कानूर पठार, विसापूर, कोळगाव, आरणगाव, देऊळगाव सिध्दी आदि १९५ मोठ्या ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे.