◻️ गटारी व रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात पैसे खाल्ल्याचा माकपचा गंभीर आरोप
◻️ धूळ व वाहतूक कोंडी यावर उपाय करण्याची मागणी ; अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा
संगमनेर LlVE (अकोले) | अकोले शहर धुळीचे अक्षरशः साम्राज्य बनले आहे. विकासाच्या नावाखाली शहरातील रस्ते व गटारींची कामे झाली. मात्र काम पूर्ण झाल्यानंतर उकरलेल्या मातीचे योग्य व्यवस्थापन न केल्याने शहरातील रस्त्यांच्या कडेला मोठ्या प्रमाणात माती साठली आहे.
अकोले शहरातून कोल्हार घोटी रस्त्याचे काम झाले. मात्र हे काम अत्यंत निकृष्ट करण्यात आल्याने वाहनांच्या जाण्या येण्याने रस्त्यावर सिमेंटचा अक्षरशः धूर उडत आहे. सायंकाळी शहरात उडणाऱ्या धुळीमुळे श्वास घेणे अशक्य होऊन बसले आहे. गटारी व रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात पैसे खाल्लेले याबाबत मुग गिळून गप्प बसले असल्याचा गंभीर आरोप माकपने केला आहे.
अगस्ती कारखान्याचा गळीत हंगाम सुरु होत आहे. उसाच्या गाड्यांमुळे वाहतुकीची कोंडी व धुळीचे साम्राज्य येत्या काळात आणखी वाढणार आहे. अगस्ती कारखान्याच्या ऊस वाहतुकीमुळे वर्षानुवर्षे अकोले शहरात वाहतून कोंडी होते. अनेक अपघात होतात.
दर हंगामाला होणाऱ्या या वाहतूक कोंडीवर कायमचा उपाय शोधावा असे सत्ताधाऱ्यांना वाटत नाही हे या तालुक्याचे दुर्भाग्य आहे. उठता बसता अजित पवारांचा दाखला देणारे अकोल्याच्या वाहतूक कोंडीवर कायमचा उपाय म्हणून अगस्ती कारखान्याला लाभ होईल यासाठी बायपास रस्त्याची मागणी करत नाही. तसा विचारही त्यांच्या मनात येत नाही हे खेदजनक आहे.
अकोले नगर पंचायत या प्रश्नावर संपूर्णपणे निष्क्रिय आहे. केवळ जनतेकडून वाढीव कर गोळा करण्यातच नगर पंचायत मशगुल आहे. धूळ व वाहतूक कोंडी यावर उपाय करणे आपली जबाबदारी आहे असे त्यांना वाटत नाही. नगर परिषद व अगस्ती कारखान्याने मिळून रोज सकाळी व सायंकाळी शहरात रस्त्यावर पाणी मारले व गटारी व रस्त्यांच्या कामामुळे कडेला साठलेली माती बाहेर काढली तर शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल.
रस्त्याच्या कामाच्या निकृष्ट दर्ज्यामुळे सिमेंटचा वरचा थर धुऊन गेला आहे. लोकप्रतीनिधिनी तहसील कार्यालयातील बैठकीत हा थर पुन्हा टाकला जाईल असे ठेकेदाराच्या समोर सांगितले होते. असे केल्याने रस्त्याचे उडणारे सिमेंट थांबविता येईल. संबंधितांनी या प्रश्नाबाबत तातडीने एकत्र बैठक घेऊन या उपाय योजना कराव्यात. तसेच अगस्ती कारखान्याने उस वाहतूक शहराच्या बाहेरून करावी अशी मागणी माकपने केली आहे. संबंधितांनी सदरच्या प्रश्नावर कारवाई न केल्यास माकप रस्त्यावर उतरेल असा इशारा डॉ. अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, ज्ञानेश्वर काकड यांनी दिला आहे.