आश्वी खुर्द येथील प्राध्यापक हिवरगाव पावसा टोलनाक्यालगत झालेल्या अपघातात ठार
◻️ कारखेले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला
◻️ विद्यार्थ्यांनसह आश्वी पंचक्रोशीत शोककळा
संगमनेर LIVE | संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन येथे कार्यरत असलेले प्राध्यापक प्रकाश सोनाजी कारखेले (वय - ५५, हल्ली रा. लोणी व राहुरी) यांचा हिवरगाव पावसा टोलनाक्यालगत गुरुवारी सायंकाळी झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, प्रा. प्रकाश कारखेले हे गुरुवारी सायंकाळी संगमनेरच्या दिशेने येत होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाक्यालगत परिवहन महामंडळाच्या बसबरोबर झालेल्या अपघातात प्रा. प्रकाश कारखेले हे ठार झाले आहेत.
प्रा. प्रकाश कारखेले हे आश्वी खुर्द येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यानिकेतन येथे इंग्रजी विषय शिकवत होते. मुळचे पाथर्डी तालुक्यातील त्रिभुवनवाडी येथील असलेले कारखेले हे नोकरीनिमित्त राहुरी व नंतर लोणी येथे स्थायिक झाले होते. त्यांनी पुणे, नाशिक, चिंचोली, कोल्हार, पाथरे याठिकाणी ज्ञान दानाचे काम केले असून आश्वी खुर्द येथे मागील ८ वर्षांपासून कार्यरत होते.
दरम्यान त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ एक बहीण असा मोठा परिवार असून ऐन सणासुदीच्या काळात त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे कारखेले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर विद्यार्थ्यानसह आश्वी पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे. शुक्रवार दुपारी राहुरी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून यावेळी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक तसेच मोठा जनसमुदाय उपस्थित होता.