दुध दर प्रश्नी हस्तक्षेप करा, अन्यथा आंदोलन!

संगमनेर Live
0
दुध दर प्रश्नी हस्तक्षेप करा, अन्यथा आंदोलन!

◻️ किसान सभेचा दुग्धविकास विभागाला इशारा
 
◻️ ३४ रुपयाऐवजी दूधाचे बेस रेट २७ रुपयांपर्यंत आले खाली

संगमनेर LlVE | राज्यात दुध संघ व कंपन्यांनी संगनमत करून दुधाचे भाव पाडल्याने दुध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. दुधाच्या चढ उतारामुळे निर्माण होणारी अस्थिरता संपविण्यासाठी दुग्धविकास विभागाने दुधाचे खरेदी दर निश्चित करण्यासाठी समिती नेमली होती. 

खाजगी व सहकारी दुध संघांचे व दुध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच सरकारी अधिकारी यांचा समावेश असलेल्या समितीने दर तीन महिन्याने दुध खरेदीदर ठरवावेत व दुध संघांनी आणि कंपन्यांनी यानुसार दर द्यावेत असे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी जाहीर केले होते. यानुसार दुधाला ३४ रुपये दर जाहीर करण्यात आला होता. मात्र या दरात रिव्हर्स दराची मेख मारून दुध कंपन्यांनी त्यावेळी दर पाडले. आता तर हा आदेशच धाब्यावर बसविण्यात आला आहे. ३४ रुपयाऐवजी बेस रेट २७ रुपयांपर्यंत खाली आणण्यात आला आहे. 

राज्यात सणासुदीच्या काळात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिठाई निर्मितीसाठी दुधाची मागणी वाढलेली असताना व दुष्काळ असल्याने  दुधाचे उत्पादन घटले असताना मागणी पुरवठ्याचे गणित पाहता दुध दर वाढायला पाहिजे होते. मात्र या उलट मागणी कमी व उत्पादन अधिक असल्याचे सांगितले जात आहे. दुध कंपन्यांचा हा दर पाडण्यासाठी केलेला कांगावा आहे. शिवाय या सोबतच राज्यात मोठ्या प्रमाणात होत असलेली बनावट दुध निर्मिती हेही दर कोसळण्या मागचे एक मोठे कारण आहे. जोडीला सदोष मिल्कोमीटर व वजनकाट्यांचा वापर करून शेतकऱ्यांची लुटमार नित्याची बाब आहे. 

भेसळयुक्त दुध नियंत्रणाची जबाबदारी अन्न व औषधी प्रशासनाकडे आहे. वजनकाटे व मिल्कोमीटर तपासण्याची जबाबदारी वजनकाटे वैधतामापन विभागाकडे आहे. दोन्ही विभाग ‘मनुष्यबळाचा अभाव’ हे कारण देत आपली जबाबदारी झटकत आले आहे. अशा पार्श्वभूमीवर दुध भेसळ, वजनकाटे आणि मिल्कोमीटर तपासण्याची जबाबदारी संबंधित विभागांकडून काढून घेऊन दुग्धविकास विभागाकडे दिल्यास याबाबतचा प्रश्न सोडविण्यास मदत होणार आहे. 

राज्य सरकारने याबाबत तसा निर्णय करावा  तसेच दुधदर निश्चित करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीस कायदेशीर वैधता द्यावी, या समितीची  दर शिफारस दुधसंघ व दुध कंपन्यांवर बंधनकारक करावी, गायीच्या दुधाला किमान ३५ रुपये दर मिळेल यासाठी हस्तक्षेप करावा. अशी मागणी अखिल भारतीय किसान सभा व दुध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे डॉ. अशोक ढवळे, डॉ. अजित नवले, उमेश देशमुख, सतीश देशमुख, जोतीराम जाधव, रामनाथ वदक, महादेव गाढवे, इंद्रजीत जाधव, दादा गाढवे, दीपक पानसरे, दीपक वाळे, राजकुमार झोरी, श्रीकांत करे, डॉ. अशोक ढगे, अमोल गोऱ्डे, नंदू रोकडे आदींनी केली आहे.

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !