देशाचा विसर पडू न देता प्रत्येकाने देशसेवा करावी - पद्मभूषण अण्णा हजारे

संगमनेर Live
0
देशाचा विसर पडू न देता प्रत्येकाने देशसेवा करावी - पद्मभूषण अण्णा हजारे

◻️ध्वजदिन निधी संकलनामध्ये अहमदनगर जिल्हा राज्यात अग्रेसर रहावा

◻️जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने ध्वजदिन निधीस सढळ हस्ते मदत करावा - जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

संगमनेर LIVE (अहमदनगर) | भारत देशाने, देशाच्या मातीने आपल्याला सर्वस्व दिले त्या देशाचा विसर पडू न देता प्रत्येकाने देशसेवा करण्याचे आवाहन पद्मभूषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज सशस्त्र सेना ध्वजदिन २०३३ निधीचा शुभारंभ पद्मभूषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

व्यासपीठावर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे, कर्नल शेळके, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉड्रन लिडर विद्यासागर कोरडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पद्मभूषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले की, आयुष्यामध्ये देशरक्षणाचे ध्येय उराशी बाळगुन सैन्यामध्ये भरती होत देशसेवा केली. वयाच्या ८८ व्या वर्षीसुद्धा देशाच्या कल्याणासाठी काम करण्याची उर्मी आहे. देशाने, या देशाच्या मातीने आपल्याला सर्वस्व दिले आहे. देशाचा विसर पडू न देता प्रत्येकाने देशसेवा करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सैनिकांच्या कल्याणासाठी सुरु करण्यात आलेल्या ध्वजदिन निधीच्या उद्दिष्टापैकी अधिकचा निधी जमा केल्याबाबत सर्वांचे कौतुक करत देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समाजातील प्रत्येकाने या ध्वजदिन निधीस मदत करण्याचे आवाहनही पद्मभूषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी यावेळी केले.

ध्वजदिन निधीस सढळ हस्ते मदत करा..

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले, प्रतिकूल परिस्थितीमध्ये देशाच्या रक्षणार्थ सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या समर्पणामुळेच देशाच्या सुरक्षितेबरोबरच अखंडता अबाधित आहे. सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ध्वजदिन निधीस प्रत्येकाने सढळ हस्ते मदत करावी. भौगोलिकदृष्ट्या अहमदनगर हा मोठा जिल्हा आहे. सहकाराची पार्श्वभूमी, नैसर्गिक समृद्धी, कृषी, दुग्धउत्पादनामध्ये अग्रेसर असलेल्या आपल्या जिल्ह्यातून अधिकच्या निधी संकलनाची अपेक्षा आहे. त्यामुळे ध्वजदिन निधी संकलनासाठी चालू वर्षात 5 कोटी रुपयांचे ध्वजदिन निधीचे संकलन करुन अहमदनगर जिल्हा संपुर्ण राज्यात निधी संकलनामध्ये अग्रेसर रहावा. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने ध्वजदिन निधीस प्रत्येकी किमान १० रुपयांची मदत करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ  यांनी  केले.

सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तालुकानिहाय समन्वयकांची नियुक्ती..

महसुल सप्ताहामध्ये एक दिवस सैनिकांसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या माध्यमातून विविध शिबीरे घेऊन माजी सैनिकांच्या असलेल्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी जावीणपूर्वक प्रयत्न करण्यात आला. तसेच सैनिकहो तुमच्यासाठी या उपक्रमातुनही प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या सैनिकांच्या प्रकरणांचा मोठ्या प्रमाणात निपटारा करण्यात आला. सैनिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तालुकानिहाय समन्वयकाची नेमणुक करण्यात येणार असुन या समन्वयकांच्या माध्यमातून सैनिकांच्या अडचणी जिल्हा प्रशासनापर्यंत पोहोचवुन त्यांचा तातडीने निपटरा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सैनिकांच्या वसतीगृह तसेच आरामगृहाच्या दुरुस्तीसाठीही मुबलक प्रमाणात निधी उपलब्ध करुन देण्यात आला असल्याचेही जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले.

गतवर्षातील ध्वजदिन निधी संकलनामध्ये अनेक शासकीय कार्यालयांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचे कौतुक करत साईसंस्थाननेदेखील सैनिकांच्या कल्याणासाठी ७५ लक्ष रुपयांचा निधी दिला आहे. चालू वर्षातसुद्धा संस्थानतर्फे अधिक प्रमाणात ध्वजदिन निधीस मदत उपलब्ध होणार आहे. ध्वजदिन निधीचे अधिक प्रमाणात संकलन होण्यासाठी प्रत्येक शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनातुन एक दिवसांचा पगारही या निधीसाठी संकलित केला जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स्क्वॉड्रन लिडर विद्यासागर कोरडे म्हणाले की, शासनाने ध्वजदिन निधीचे १ कोटी ८४ लक्ष रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी या ध्वजदिन निधीस भरीव मदत करण्याच्या आवाहनास जिल्ह्यातील शासकीय कार्यालये, विविध संस्थांनी भरभरुन प्रतिसाद दिला असुन या सर्वांच्या सहकार्यामुळे तब्बल सव्वादोन कोटी रुपयांपेक्षा अधिकचे संकलन करण्यात यश प्राप्त झाले असल्याचे सांगत सशस्त्र सेना ध्वजदिनाची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान या कार्यक्रमात माजी सैनिक पाल्यांनी दहावी व बारावी परिक्षेत, विशेष प्राविण्य मिळविल्याबद्दल या विद्यार्थ्यांचा प्रशिस्तीपत्र व धनादेश देऊन तसेच ध्वजदिन निधी संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या शासकीय कार्यालय प्रमुखांचा प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी शहीद मित्रमंडळाचे अध्यक्ष मोहन नरहरी नातू यांच्यातर्फे शहीद जवानांच्या  कुटूंबाला मदतीचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्लवनाने करण्यात आली. यावेळी शहीद जवानांना उपस्थित मान्यवरांसह उपस्थितांनी दोन मिनिटे स्तब्धता बाळगून श्रद्धांजली अर्पण केली. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली. या कार्यक्रमाचे सुत्र संचलन डॉ. अमोल बागुल यांनी केले तर आभार अंकुश हांडे यांनी मानले. कार्यक्रमास वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, माजी सैनिक यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !