शिर्डी मतदार संघासह नाशिक, मराठवाड्याला घाटमाथ्याचे पाणी उपलब्ध करून द्या
◻️ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे खासदार सदाशिवराव लोखंडे यांची मागणी
◻️ पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर व्हावी यासाठी खासदार लोखंडे आग्रही
संगमनेर LIVE (नवी दिल्ली) | शिर्डी लोकसभा मतदार संघातील पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी घाटमाथ्याचे पाणी शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावे, तसेच अहमदनगर (शिर्डी), नाशिक, मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांना ११५ टीएमसी पाणी उपलब्ध होण्याची मागणी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी लोकसभेच्या शीतकालीन सत्राच्या शुन्यप्रहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे आज केली.
सह्याद्री पर्वतरांगातून समुद्राकडे वाहून जाणारे घाटमाथ्यातील पाणी अडवल्यास ११५ टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते. यापैकी १५ टीएमसी पाणी मुळा, गोदावरी व प्रवरा नद्यांवर कोल्हापुरी टाइप बंधारे बांधून या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी केला जाऊ शक्तो. तसेच उर्वरित ५ टीएमसी पाणी अकोले - संगमनेर - कोपरगाव - श्रीरामपूर या चार तालुक्यातील वंचित शेतकऱ्यांना उपलब्ध होईल. असे एकूण २० टीएमसी पाणी शिर्डी मतदार संघात उपलब्ध होऊ शकेल व त्यांच्या समस्या सुटण्यास मदत होईल.
यासोबतच नाशिकसाठी १० टीएमसी व उर्वरित ठी ८५ टीएमसी पाणीसाठा मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांसा उपलब्ध होण्याबाबतची मागणी त्यांनी लोकसभा अध्यक्षांमार्फत पंतप्रधान यांच्याकडे केली. तसेच यासाठी पंतप्रधानांनी राज्य शासनाकडून याबाबत सविस्तर प्रस्ताव मागवून व त्यास केंद्रसरकारने मंजूरी देण्याबाबतची यावेळी विनंती केली.