गांधी, विनोबा, टागोर आणि बंगबंधुंच्या विचारात शांती - सद्बभावयुक्त विश्व निर्मितीचे बीज

संगमनेर Live
0
गांधी, विनोबा, टागोर आणि बंगबंधुंच्या विचारात शांती - सद्बभावयुक्त विश्व निर्मितीचे बीज

◻️ बांगलादेशातील महात्मा गांधी आश्रम ट्रस्टचे संचालक राह नबा कुमार यांचे गौरवोद्गार 

◻️विजयालक्ष्मी सोमाणी (मध्यप्रदेश), डॉ. मेधा आणि डॉ. राजेंद्र मलोसे (जि. नाशिक) आणि श्रीमती मनीषा पोटे (जि. नाशिक) यांचा सन्मान 

संगमनेर LIVE (अहमदनगर) | गांधी, विनोबा, टागोर आणि बंगबंधुंच्या विचारांतच शांती - सदभावयुक्त विश्व निर्मितीचे बीज आहे. प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने मानवतेच्या पायावरील त्यांची भावधारा अनुसरली तरच एका सुखी आणि शांततामय  विश्वाची निर्मिती  शक्य असल्याचे प्रतिपादन बांगलादेशातील महात्मा गांधी आश्रम ट्रस्टचे संचालक राह नबा कुमार यांनी येथे केले.

अहमदनगर येथील स्नेहालय संस्थेच्या बा-बापू आणि विनोबा पुरस्कारांनी यंदा अनुक्रमे विजयालक्ष्मी सोमाणी (इंदूर, मध्य प्रदेश), डॉ. मेधा आणि डॉ. राजेंद्र मलोसे (चांदवड, जि. नाशिक) आणि श्रीमती मनीषा पोटे (युवा मित्र संस्था, सिन्नर, जि. नाशिक) यांना काल सन्मानित करण्यात आले. 

पेमराज सारडा महाविद्यालयातील  सभागृहात झालेल्या कार्यक्रमात राह नबा कुमार आणि बांगलादेश मधील आघाडीच्या मानवाधिकार कार्यकर्त्या श्रीमती तांद्रा बारूआ यांनी हे पुरस्कार प्रदान केले. ५० हजार रूपये, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, पुस्तक असे या प्रत्येक पुरस्काराचे स्वरूप असते.

राह नब कुमार यावेळी म्हणाले की, हिंसेतून शांतता नव्हे तर फक्त प्रतिहिंसा निर्माण होते, हे  महात्मा  गांधी यांनी १९४६ मध्ये नोखाली येथे प्रेमपूर्वक लोकांना समजावून सांगून येथील हिंसा आणि दंगल थांबवली. अतिरेकी राष्ट्रवादामुळे मानवतेचा बळी जाणार असेल तर आपण मानवतेचीच पाठराखण करणार ही स्पष्ट भूमिका राष्ट्रकवी रवींद्रनाथ टागोर यांनी घेतली. 

भूदान चळवळीतून आर्थिक आणि सामाजिक समता आणण्याचा मार्ग विश्वसंत विनोबांनी दाखवला. तर कोणत्याही देश - धर्म अथवा सत्तेला  मानवाधिकारांना कधीही बंदिस्त करता येणार नाही, ही भूमिका बांगलादेशचे राष्ट्रपिताभंग बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांनी जगासमोर मांडली. जगातील सध्याची युद्ध, धार्मिक - वंशिक - भाषिक - प्रांतिक- लैगिंक ई. अभिनिवेशातून होणारी हिंसा आणि द्वेष यातून जगाला वाचविण्याची क्रांतीबीज वरील विचारवंतांनी दिले. सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांनी या भूमिकेचा स्वीकार आणि प्रचार करावा, असे प्रतिपादन राह नबा कुमार यांनी केले.

प्रेरणेचा प्रवास..

सर्व पुरस्कार प्राप्त कार्यकर्त्यांनी आपला प्रेरणेचा प्रवास यावेळी सांगितला. ‘बा’ पुरस्काराकरिता निवडलेल्या विजयालक्ष्मी सोमानी यांनी नवयुग आरंभ एज्युकेशन एंड सोशल वेलफेयर सोसायटी या संस्थेची २००९ मध्ये स्थापना केली. इंदूरमधील झोपडपट्टीतील ३०० बालकांचे शिक्षण, सर्वांगीण विकास आणि येथील महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात त्यांनी प्रेरक कार्य केले. संसाधने नसली तरी  केवळ आंतरिक ऊर्मीच्या आधारे काम  कसे उभे केले  हे त्यांनी नमूद केले.

बापू पुरस्कार प्राप्त डॉ. मेधा आणि डॉ. राजेंद्र मलोसे या दांपत्याने १९७० च्या दशकातील ग्रामीण आणि आदिवासी  भागातील वैद्यक सेवेचे खडतर अनुभव सांगितले. एमबीबीएस झाल्यावर महानगरांमधील आर्थिक फायदा देणाऱ्या संधी त्यांनी नाकारल्या. बाबा आमटे यांच्या सूचनेवरून नाशिक जिल्ह्यातील चांदवड गावात दवाखाना चालू केला. तेथील आदिवासी आणि गरीब रुग्णांना गेली ४५ वर्ष अल्प दरात आणि पैसे नसतील तर मोफतच उपचार दिले. निसर्ग संवर्धन, स्वच्छ्ता अशी मूल्ये रुजविली. आता शहरीकरण चांदवडपर्यंत आले आहे . त्यामूळे सेवेसाठी दुसरा दुर्गम ग्रामीण आणि आदिवासी भाग शोधत असल्याचे या दांपत्याने सांगितले.

ध्यास खेडी जगवण्याचा..

विनोबा पुरस्कार स्वीकारल्यावर श्रीमती मनीषा पोटे म्हणाल्या की, अनेक कारणांनी मृत्युपंथाला लागलेली खेडी जगवली तरच उद्याचा भारत समृद्ध असणार आहे. युवामित्र संस्थेच्या माध्यमातून  ग्रामीण भागातील आर्थिक आणि सामजिक प्रश्न त्यांनी  मागील २८ वर्षात सोडविले. पाणी, शिक्षण, आरोग्य, संस्था बांधणी आणि उपजीविका विकासातील अनुभव त्यांनी नमूद केले.

शेळीपालन आणि अन्य उपक्रमांसाठी प्रशिक्षण आणि बीज भांडवल देऊन १० हजार परिवारांना दारिद्र्यरेषेच्या काढले. असेच काम करण्यासाठी इतर संस्था आणि कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

इंग्लंडमधील भारतसेविका आणि अभिनेत्री लॉरेल हॉडसन, वंचित विद्यार्थ्यांना बेकरीचे काम शिकवणारे ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड बाऊलीन  आणि अमेरिकेतील न्यूजर्सी भागात भारतातील सामाजिक संस्थांसाठी कार्यरत असलेले मूळ जामखेड (जिल्हा नगर) येथील आशिष देशपांडे यांनाही यावेळी गौरविण्यात आले.

बांगलादेश मध्ये १९४६ पासून गांधी आश्रम ट्रस्टने केलेल्या कामांबद्दल नबा कुमार यांनी माहिती दिली. राह नबा कुमार यांना नुकताच गांधीवादी मूल्यांचा जगभरात गेली ३४ वर्ष अविरत प्रचार व प्रसार केल्याबद्दल  जागतिक कीर्तीच्या जमनालाल बजाज पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याबद्दल त्यांना गौरविण्यात आले. प्रास्ताविकात संस्थेचे अध्यक्ष संजय गुगळे यांनी नमूद केली की, स्नेहालय संस्था सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना आणि संस्थांना समाजमान्यता, बहुविध स्वरूपाचे पाठबळ आणि नव्या कल्पना  देण्यासाठी गेली ३० वर्षे विविध वार्षिक  सन्मान - पुरस्कार देते. वर्ष २०२० पासून बा, बापू आणि विनोबा पुरस्कार संस्थेचे विश्वस्त किरिटी शामकांत मोरे आणि सौ. भारती मोरे (पुणे) यांनी सहयोग ठेव देऊन सुरु केले. या निमित्ताने स्नेहालय आपले देणगीदार आणि कार्यकर्ते यांना सन्मानित संस्थांशी जोडते. त्यांना बळ देते. बा पुरस्कार हा सेवाव्रती श्रीमती सीताबाई मांढरे यांच्या स्मृतीनिमित्त, बापू पुरस्कार हा स्वातंत्र्यसैनिक माजी आमदार श्यामकांत दामोदर मोरे यांच्या स्मृतीनिमित्त आणि विनोबा पुरस्कार पुणे जिल्ह्यातील शिक्रापूरचे आदर्श माजी सरपंच कै. रावसाहेब पाटीलबुवा मांढरे यांच्या स्मृतीनिमित्त देण्यात आला.

दिवाळी अंकांचा सन्मान..

पारितोषिक वितरण स्नेहालयाच्या रेडिओ नगर ९०.४ एफ.एम चॅनेल च्या वतीने घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेचे पुरस्कारही यावेळी प्रदान करण्यात आले. मंगळवेढा येथून प्रकाशित होणाऱ्या इंद्रजीत घुले यांनी संपादित केलेला "शब्द शिवार" याच प्रथम पारितोषिक देण्यात आले. कल्याण तावरे संपादित "आर्याबाग" दिवाळी अंक पुणे येथून प्रकाशित झाला. त्या द्वितीय तर सौ. अपर्णा चव्हाण संपादित 'मनोकल्प' पुणे येथून प्रकाशित दिवाळी अंकास तृतीय क्रमांक देण्यात आला. अंधजनांसाठी काढलेल्या स्वागत थोरात यांनी संपादित केलेल्या 'स्पर्शज्ञान' या ब्रेल लिपीतील दिवाळी अंक सर्वोत्तम ठरला. तो मुंबईतून प्रकाशित झाला आहे. गौरव चिन्ह व सन्मानपत्र देऊन सर्व संपादकांना यावेळी गौरविण्यात आले.
 
सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावीत, लेखिका इंदुमती आणि जेष्ठ पत्रकार महावीर जोंधळे, राजीव गुजर आदींनी मनोगते व्यक्त केली. राजीव कुमार आणि सौ. स्वाती रानडे यांनी सूत्रसंचालन केले.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !