आपले सकारात्मक विचारच शरीराचे आरोग्य व आयुष्य बदलू शकतात - शिवानी दिदी
◻️ लोणी येथे ‘नात्यांमधील गोडवा' या विषयावर व्याख्यान संपन्न
संगमनेर LIVE (लोणी) | आपले सकारात्मक विचारच शरीराचे आरोग्य बनवत असतात. मनाला स्वच्छ ठेवा,भूतकाळात तुमच्याशी झालेले व्यवहार विसरून जा. दुसऱ्याला आपण बदलवू शकत नसल्याने आपण सतत सत्कर्म केले पाहिजे. आपले कर्मच आपले भाग्य ठरवित असल्याचा संदेश आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्याख्यात्या शिवानी दिदि यांनी दिला.
लोणी येथे प्रवरा उद्योग समूह आणि प्रजापिता ब्रह्मकुमारीज विश्वविद्यालय लोणी शाखेच्या वतीने 'नात्यांमधील गोडवा' या विषयावर शिवानी दीदी यांच्या व्याख्यानाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, महंत उद्धव महाराज मंडलिक, प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या विश्वस्त सुवर्णाताई विखे पाटील, रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील, विखे कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे, प्रवरा बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, ट्रक्स वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, ध्रुव विखे पाटील, सोपान मैड, शांतीनाथ आहेर, राम मैड, भारत घोगरे, भारत महाराज धावणे, उषा दीदी, रोहीणी दिदी, भाग्यश्री दिदी, आशा दीदी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवानी दीदी यांनी सकारात्मक विचार तुमचे आयुष्य बदलू शकतात हे स्पष्ट करताना सांगितले की, स्वतःशी नातं जोडा, स्वतःशी संवाद साधा. सकारात्मक विचारांनी शरीरातील ऊर्जा वाढते.
नातं हे व्यवहारातून नाही तर विचारातून बनत असते. आपले सकारात्मक विचार आपल्या शरीराचे आरोग्य बनवतात. मनाला स्वच्छ ठेवा.भूतकाळातील तुमच्याशी झालेले दुरव्यवहार विसरून जा. दुसऱ्याच्या दुरव्यवहाराने त्याचे भाग्य बनते. आपण दुसऱ्याला बदलू शकत नसल्याने आपण सतत सत्कर्म करीत रहावे. आपले कर्मच आपले भाग्य बनवत असल्याचे त्यांनी आपल्या प्रबोधनातून सांगितले.
दुसऱ्याशी तुलना, इर्षा हे आपल्याला कमकुवत बनवतात. विचार, व्यवहार आणि बोलणे हे कर्म असते. ते जसे असेल तसे फळ मिळत असते. ईश्वर आपले भाग्य लिहीत नाही तर आपले भाग्य आपणच लिहीत असतो फक्त लिहिण्याची पद्धत ईश्वराची आहे. कर्माचा हिशोब दोन शरीरात नाही तर दोन आत्म्यांमध्ये होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तुमच्याशी कुणी दुरव्यवहार करीत असेल तर तो त्याचा दोष नसून तुम्ही पूर्वी केलेल्या कर्माचा परतावा असतो. दररोज झोपण्यापूर्वी सर्वाना क्षमा करा. सर्वांचे आभार माना. तुमच्याकडून काही चुकीचे झाले असेल तर माफी मागा असे सांगत तुमचे जीवन तुमच्या हातात आहे त्याला सुखी, आरोग्यदायी आणि आनंदी बनवा असे आवाहन केले.
प्रारंभी अण्णासाहेब म्हस्के पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी उद्योग समूहाच्या वतीने शिवानी दीदी यांचा सत्कार केला. यावेळी परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते.