महत्वाची बातमी.. सोमवारी भरणाऱ्या आश्वी बुद्रुक येथील आठवडे बाजाराच्या जागेत बदल
◻️ खा. शरद पवार यांच्या आश्वी येथिल नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन
◻️ शेतकरी, व्यापारी व भाजीपाला विक्रेत्याना सहकार्य करण्याचे आवाहन
संगमनेर LIVE | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्र पवार हे संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे आपल्या नियोजित दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवार दि. २ जानेवारी रोजी येणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव सोमवारी नियमीतपणे भरणाऱ्या आठवडे बाजाराच्या जागेत ग्रामपंचायत प्रशासनाने बदल केल्याची माहिती समाजमाध्यमातून मिळाली आहे.
आश्वी सह पंचक्रोशीतील गावातील शेतकरी, व्यापारी, बागायतदार तसेच लहान मोठे भाजीपाला व्यावसायिक हे आश्वी बुद्रुक येथे सोमवारी भरणाऱ्या आठवडे बाजारासाठी येत असतात. यातून मोठी अर्थिक उलाढाल होत असते. मात्र मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्र पवार हे आश्वी दौऱ्यावर येणार आहेत.
त्या पार्श्वभूमीवर बाजारतळावर मंडप व स्टेज उभारणीचे काम सुरु आहे. यांची पाहणी करण्यासाठी प्रशासनातील मोठे अधिकारी सोमवारी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव तसेच शेतकरी व भाजीपाला विक्रेते याना त्रास सहन करावा लागू नये, यासाठी या ठिकाणी भरणारा आठवडे बाजार हा हनुमान मंदिर तसेच एसटी स्टँड परिसरात भरविला जाणार असल्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान शेतकरी, व्यापारी व भाजीपाला विक्रेत्यानी सहकार्य करण्याचे आवाहन समाजमाध्यमातून ग्रामपंचायत पदाधिकारी यानी केले आहे.