वरवंडी येथील फिरत्या नारळी सप्ताहाची दत्तगिरी महाराजांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता
◻️ १९ डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान भक्तीचा सुगंध परिसरात दरवळला
◻️ कॉग्रेसचे बाळासाहेब थोरात व भाजपच्या सौ. शालिनीताई विखे पाटील उपस्थित
संगमनेर LIVE | ब्रह्मलीन महंत माणिकगिरी महाराज व बिरोबा महाराज यांच्या फिरत्या पंधराव्या नारळी सप्ताहाची वरवंडी (संगमनेर) येथे रविवारी ह. भ.प. दत्तगिरी महाराजांच्या अमृततुल्य काल्याच्या किर्तनाने सांगता झाली.
अध्यात्मिक मार्ग दाखविणारे ब्रम्हलीन माणिकगिरी महाराज यांचे कार्य अलौकिक असुन हा अखंड हरिनाम सप्ताह वारकऱ्यांचा महाउत्सव व संत विचारांची प्रेरणा देण्यासाठी हरीनाम सप्ताह गरजेचा आहे, असे गौरवोउद्गार यावेळी उपस्थितांनी काढले. संत विचारात कुठल्याही जाती धर्माचे बंधन नाही तर संतांचे विचार सर्व मानव जातीसाठी होते असे प्रतिपादन आ. बाळासाहेब थोरात यांनी केले. तसेच संतांच्या विचारानेच आताची पिढी घडतेय असे सौ. शालिनी विखे पाटील आपल्या भाषणात म्हणाल्या आहेत.
सप्ताहाची सुरुवात १९ डिसेंबर ते २४ डिसेंबर दरम्यान महंत माणिकगिरी महाराज यांचे उत्तराधिकारी ह. भ. प. दत्तगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली झाली होती. रविवारी त्यांच्याच काल्याच्या कीर्तनाने मोठ्या उत्साहात या सप्ताहाची सांगता झाली. यावेळी वरवंडी पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. याप्रसंगी भाविकांनी फुगडीचा आनंद घेतला. महंत दत्तगिरी महाराजांनी सप्ताहाचे भव्य यशस्वी आयोजन केल्याबद्दल वरवंडी गावकऱ्यांचे आभार मानले. या सप्ताहासाठी लाभलेली जागा भोसले परिवाराने दिली याबद्दल त्यांची कृतज्ञता देखील व्यक्त करण्यात आली.
या सप्ताह समाप्तीवेळी कॉग्रेसचे जेष्ठ नेते माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, माजी जिल्हापरिषद अध्यक्षा व भाजपच्या सौ. शालिनीताई विखे पाटील, इंद्रजीत थोरात, मिराताई शेटे, ॲड. रोहिणीताई निघुते शंकर खेमनर, पोपट वाणी, शरद थोरात आदिसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान यावेळी सप्ताह कमिटीचे अध्यक्ष अशोक गागरे व अर्जुन वर्पे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गावातील ज्या महिला बचत गटांनी सात दिवस परिश्रम घेतले त्यांचा सौ. शालिनी विखे पाटिल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे.