जिल्हा कृषी महोत्सवाचे सुक्ष्म नियोजन करा - जिल्हाधिकारी
◻️जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आत्मा नियामक मंडळाची बैठक
◻️पीकपेरणी, पीकविमा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आदि योजनांचा आढावा
संगमनेर LIVE (अहमदनगर) | कृषी विषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी ठरणाऱ्या जिल्हा कृषी महोत्सवाचे सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आत्मा नियामक मंडळ बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी श्री सालीमठ बोलत होते.
बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, आत्माचे प्रकल्प संचालक विलास नलगे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ म्हणाले की, कृषि विषयक नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचुन त्यांच्या आर्थिक उत्पन्रात भर पडावी यादृष्टीने सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा शेतमाल मिळावा यासाठी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री शृखंला विकसित करणे, कृषि विषयक परिसवांद, व्याख्यानाद्वारे विचारांच्या देवाण घेवाणीद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण, विक्रेता - खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषि उत्पादनास आणि विपणणास चालना देणे या जिल्हा कृषी महोत्सवातुन शक्य होणार असल्याने पालकमंत्र्यांशी विचार विनिमय करत या महोत्सवाचे सुक्ष्म व काटेकोरपणे नियोजन करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी दिले.
जिल्ह्यात ऊस उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा अधिक कल दिसुन येतो. ऊस उत्पादनासाठी अधिक प्रमाणात पाण्याचा वापर होत असल्याने कमी पाण्यात व कमी खतामध्ये अधिक ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर सत्राचे आयोजन करण्यात यावे. जीडीपी दर वृद्धीमध्ये कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राच्या विस्तारासाठी विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पीकपेरणी, पीकविमा, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, कोरडवाहू क्षेत्र कार्यक्रम यासह इतर योजनांचा व्यापक स्वरुपात आढावा घेतला. बैठकीस संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.