◻️ पृथ्वीराज चव्हाण, रमेश चेन्नीथला, जितेंद्र आव्हाड, भास्करराव जाधव, एच. के. पाटील राहणार उपस्थिती
◻️ उल्हास दादा पवार यांना भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार तर जैन उद्योग समूहास डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार
◻️ गुरुवारी पुष्पा फेम गायक जावेद आली यांचा लाईव्ह कॉन्सर्ट
संगमनेर LIVE | थोर स्वातंत्र्यसेनानी अमृत उद्योग समूहाचे संस्थापक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार व डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार वितरण रविवार दि. ७ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १ वा. जाणता राजा मैदान येथे कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री ना. सिद्धरामय्या यांच्या शुभहस्ते व महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला व कर्नाटकचे मंत्री एच. के. पाटील, विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती मा. आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे.
यशोधन जनसंपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मा. आ. डॉ. सुधीर तांबे यांनी माहिती दिली. यावेळी समवेत मा. महसूल मंत्री तथा मा. प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात हे ही उपस्थित होते.
यावेळी ते म्हणाले की, २०२३-२४ हे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची जन्मशताब्दी वर्ष असून या निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबरोबर अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने साहित्य, सहकार, समाजकारण, कृषी,पर्यावरण या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल संत साहित्याचे गाढे अभ्यासक ज्येष्ठ नेते उल्हास दादा पवार यांना स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे तर कृषी, शिक्षण, संशोधन, पत्रकारिता या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने जैन उद्योग समूह जळगाव यांना गौरवण्यात येणार आहे. एक लाख रुपये रोख सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेच्या वतीने सहकारातील आदर्श नेतृत्व पुरस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारातील नेते आमदार पी. एन. पाटील यांना दिला जाणार आहे. याचबरोबर ७ जानेवारी ते १२ जानेवारी या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
या सर्व कार्यक्रमांसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन जयंती महोत्सव समितीचे निमंत्रक आमदार सत्यजित तांबे व एकविरा फाउंडेशन च्या अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या पुतळ्याचे अनावरण..
अमृत उद्योग समूहाचे संस्थापक, स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने साखर कारखाना नूतन कार्यालयाच्या समोर उभारण्यात आलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या पुतळ्याचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
जयंती महोत्सवातील सांस्कृतिक कार्यक्रम..
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असून जाणता राजा मैदानावर सोमवार दि. ८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वा. स्थानिक कलाकारांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम आनंद सोहळा हा होणार आहे. मंगळवार दि. ९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वा होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकर प्रस्तुत खेळ मांडीयेला हा कार्यक्रम होणार आहे. तसेच गुरुवार ११ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता बॉलीवूड मधील आघाडीचा पुष्पा फेम गायक जावेद आली यांचा लाईव्ह कॉन्सर्ट बॉलीवूड आणि सुफी गाण्यांचा जल्लोष हा कार्यक्रम होणार आहे. तसेच शुक्रवार १२ जानेवारी रोजी प्रेरणा दिन आणि पुष्पांजलीच्या कार्यक्रमानिमित्त बापू तेरे रास्ते सौ सुरभी आणि सचिन ढोमणे प्रस्तुत भजनांचा कार्यक्रम प्रेरणास्थळ येथे होणार आहे.