पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी आश्वी बुद्रुक व खुर्द येथील पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा
◻️ दोन्ही पेट्रोल पंपावरील डिझेलचा साठा संपला!
◻️ शिबलापूर पंपावरील डिझेल - पेट्रोल साठा सोमवारीचं संपला
◻️ आश्वी बुद्रुक व खुर्द येथील पेट्रोल साठा सध्या शिल्लक असला तरी संपल्यानंतर काय?
संगमनेर LIVE | केंद्र शासनाच्या वतीने वाहन चालकांच्या संदर्भात हिट अँड रनच्या नवीन धोरणाच्या निषेधार्थ देशभरातील वाहन चालकांनी तीन दिवसीय संप पुकारलेला आहे. या संपामध्ये पेट्रोल डिझेलची वाहतूक करणारे चालक देखील सहभागी झाल्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.
त्यामुळे पेट्रोल व डिझेल मिळणार नाही या भीतीनं आश्वी बुद्रुक व आश्वी खुर्द येथील दोन्ही पेट्रोल पंपावर अचानक वाहनधारकांनी गर्दी केल्याने दोन्ही पंपावरील डिझेलचा स्टॉक संपला आहे. तर पेट्रोल भरण्यासाठी देखील वाहनधारकांनी मोठी गर्दी केली आहे.
राज्यभरात पेट्रोल पंप चालक संप करणार असल्यामुळे पंप बंद राहणार असल्याची अफवा पसरली आहे. त्यामुळं पेट्रोल मिळणार नाही या भीतीनं आश्वी बुद्रुक व खुर्द येथील पंपावर वाहनांमध्ये इंधन भरुन घेण्यासाठी कालपासूनच मोठी गर्दी उसळली आहे. यामध्ये विशेषतः पेट्रोल पंपांवर दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले आहे.
दरम्यान शिबलापूर येथील पंपावरचा पेट्रोल - डिझेलचा साठा हा सोमवारीचं संपला असल्याची माहिती पंप चालकांनी दिली असून आश्वी बुद्रुक व खुर्द येथील पेट्रोल साठा सध्या शिल्लक असला तरी संपल्यानंतर काय? यांचे मात्र उत्तर मिळू शकले नाही.
सर्वसामान्य जनतेला आमची विनंती आहे की, कुठल्याही अफवानवर विश्वास ठेवू नका. सध्या पंपावर पेट्रोल साठा उपलब्ध असून वाहनधारकांनी शांतपणे पेट्रोल भरुन घ्यावे. तसेच डिझेलचा साठा संपला असला तरी साठा उपलब्ध झाल्यानंतर पुरवठा सुरळीत केला जाईल. अशी माहिती आश्वी बुद्रुक येथील तनिष्का पेट्रोल पंपाचे तुषार आंधळे दिली आहे.