व्यक्तिगत लाभाच्या योजनांपोटी १ कोटी ४८ लाख अनुदान मंजुर - अमोल खताळ
◻️ पालकमंत्री विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग
◻️ संगमनेर तालुक्यात १९ हजार १९३ लाभार्थी
संगमनेर LIVE | राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध व्यक्तिगत लाभाच्या योजनांपोटी तालुक्यातील १९ हजार १९३ लाभार्थ्यांना डिसेंबर २०२३ अखेर १ कोटी ४८ लाख ६९ हजार ७०० रुपयांचे अनुदान मंजुर झाले आहे. महसूल तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे हे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग झाले आहे अशी माहिती संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी दिली.
राज्य शासनाच्या माध्यमातून विविध सामाजिक योजनांची अंमलबजावणी केली जाते. यामध्ये प्रामुख्याने सर्वसाधारण तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती वर्गासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, राष्ट्रीय कुटूंबलाभ योजना अशा योजनांचा यामध्ये समावेश आहे.
संगमनेर तालुक्यातील सुमारे १९ हजार १९३ लाभार्थ्यांनी योजनांचा लाभ मिळत असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यात दरमहा वर्ग करण्याच्या सुचना प्रशासनास दिल्या होत्या. त्याप्रमाणे १९ हजार १९३ लाभार्थ्यांच्या खात्यात सुमारे १ कोटी ४८ लाख ६९ हजार ७०० रुपयांचे अनुदान वर्ग झाले आहे.
माहे डिसेंबर २०२३ चे संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण ५२४० लाभार्थ्यांना ७७ लाख ७६ हजार रुपये, संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जाती ५५९ लाभार्थ्याना ८ लाख ३१ हजार ३०० रुपये, संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जमाती २२७ लाभार्थ्यांना ३ लाख ३७ हजार ५०० रुपये, श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सर्वसाधारण ५३७६ लाभार्थ्यांना ८० लाख ६४ हजार रुपये, श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जाती ७०२ लाभार्थ्यांना १० लाख ५३ हजार रुपये, श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अनुसूचित जमाती ३२५ लाभार्थ्यांना ४ लाख ८७ हजार ५०० रुपये व श्रावणबाळ गट अ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना ४०७६ लाभार्थ्यांना ५२ लाख ६५ हजार २०० रुपये मात्र अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खातेवर वर्ग करणेत आले आहे.
संगमनेर तालुक्यात नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार योजना बाबत शहरात व ग्रामीण भागात मेळावे घेऊन गरजूवंत यांना योजनेचा लाभ मिळवून देणार आहोत. योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास कोणालाही पैसे देण्याची, मध्यस्थाची गरज नाही. लाभार्थी म्हणून मानधन मिळण्यास काही अडचण येत असल्यास माझ्याशी तसेच नामदार विखे पाटील जनसंपर्क कार्यालय अथवा भाजप कार्यालय, संगमनेर येथे संपर्क साधावा असे आव्हान खताळ यांनी केले आहे.